नागपूर- मागील काही दिवसांपासून सुभाषनगर भागात याकूब, दाऊद आणि मन्या या वळुंनी हैदोस घातला होता. या वळुंना मनपाच्या कोंडवाच्या कर्मचाऱ्यांनी मोहीम राबवून जेरबंद केले.
मागील काही दिवसात या तिन्ही वळुंनी सुभाष नगरवासीयांना हैराण करून सोडले होते. लोकांना भीतीपोटी घराबाहेर निघणे कठीण झाले होते. हे वळू एकमेकासमोर आले की शक्ती प्रदर्शन सुरू करत होते. जोपर्यंत दुसरा माघार घेत नाही, तोपर्यंत ही लढत अशीच सुरू राहत होती. यात एखाद्यावेळी दुचाकी जरी मध्ये आली तर तिचे नुकसान व्हायचे. कधी कधी हे वळू चक्क लोखंडी गेटवर जाऊन आदळायचे. या वळुंच्या भांडणाचे असेच व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
सुभाष नगर परिसरात भीती आणि आर्थिक फटकाही बसला....
परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या वाहनाचे नुकसान झाले. एका व्यक्तीच्या पायाला गंभीर दुखापत झाली. वळुंच्या भीतीने लहान मुलांचे खेळणे बंद झाले. मग, मनपाला जाग आली. तर, काहींना आर्थिक फटका बसला. त्यानंतर वळूची दादागिरी संपवण्याची मोहीम मनपाने राबवली. दिवसा शक्य नसल्याने ही मोहीम रात्री राबविण्यात आली.
जोखमीची मोहीम शिताफीने राबविली...
बेफाम होणाऱ्या वळुंना कसे पकडायचे हा कर्मचाऱ्यांसमोर प्रश्न होता. यासाठी त्यांनी वळुंना मोकळ्या मैदाना पकडण्यास सुरुवात केली. वळूला दोराच्या साह्याने पकडून लोखंडी खांबाला बांधले. वळू दमल्याने अखे मोहीम फत्ते झाली. परिसरात 'दादागिरी' करणारा वळू जेरबंद झाला.