नागपूर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आली आहे. मात्र, असे असतानाही कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा दिवसेंदिवस वाढत चालली आहे. लॉकडाऊनच्या तिसऱ्या दिवशी, म्हणजेच बुधवारी तब्बल 3 हजार 370 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली.
तीन हजार रुग्णांचा नवा विक्रम..
नागपूरात 12 मार्च पासून दोन हजाराच्या घरात रुग्ण मिळण्यास सुरुवात झाली होती. यात 13 मार्चला दोन हजार पार करत 2 हजार 261 रुग्ण मिळून आले. तेच दोन हजारच्या वर सरासरी असताना मंगळवारी 2,587 रुग्ण मिळाले. त्यानंतर आता बुधवारी तीन हजारांच्या वर रुग्ण आढळून आले असून, यात मंगळवारच्या तुलनेत 783 अधिकच्या रुग्णाची नोंद झाली आहे. यामुळे कोरोना आटोक्यात येण्याऐवजी आणखी वेगाने पसरत असल्याचे दिसून येत आहे.
बुधवारी कोरोना चाचण्यांचाही विक्रम..
नागपूर जिल्ह्यात ज्या पद्धतीने नवीन रुग्णसंख्येचा विक्रम गाठला, त्याच प्रमाणे 15 हजार जणांची एकाच दिवसात कोरोना चाचणीही करण्यात आली. यांपैकी 3 हजार 370 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. यांपैकी 2 हजार 668 कोरोना बाधित रुग्ण हे शहरी भागातील, तर 699 हे बाधित ग्रामीण भागातील असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच, बुधवारी शहरात ८, तर ग्रामीणमध्ये ५ आणि बाहेरच्या जिल्ह्यांमधील ३ अशा १६ कोरोना बळींची नोंद झाली. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 4,505 जण कोरोनाचे बळी ठरले आहे. तर सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 21 हजार 118 आहे.
पूर्व विदर्भात सरासरीपेक्षा अधिक रुग्णांची नोंद..
पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यातील परिस्थिती पाहता 4 हजार 134 कोरोनाच्या बधितांची भर पडली आहे. यात नागपूर 3,370, यासोबतच भंडारा 149, चंद्रपूर 164 या दोन जिल्ह्यात सरासरी पेक्षा अधिक रुग्ण वाढलेले आहे. वर्धा 365 असून गोंदिया 39, गडचिरोली जिल्ह्यात 47 बाधित रुग्ण मिळून आले आहे. यात जवळपास 5 हजार जण कोरोनामुक्त झाले आहे. नागपूर 16, वर्धा 6, तसेच चंद्रपूर 2 आणि गडचिरोली 2 असे 26 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
हेही वाचा : लस ही कवच-कुंडल.. मात्र लस घेतल्यानंतरही होऊ शकतो कोरोना - राजेश टोपे