नागपूर - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर स्थानिक काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून येण्याची दाट शक्यता आहे. दोन वेळेला उमेदवारी मिळवून पराभूत होणाऱ्या व जनतेकडून मोठ्या अंतराने नाकारल्या जाणाऱ्या नेत्यांना पुन्हा विधानसभेची उमेदवारी देण्यात येऊ नये, अशी मागणी काँग्रेसमध्ये जोर धरत आहे.
महापालिकेचे विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे यांनी नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली आहे. परंतु, यानंतर स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी जनतेने नाकारलेल्यांना उमेदवारी न देण्याची मागणी पक्ष श्रेष्ठींकडे केली आहे. जे काँग्रेस नेते दोनदा पक्षाची उमेदवारी मिळाल्यावरही विधानसभा निवडणुकांमध्ये पराभूत झाले आहेत, त्यांना पक्षाने यंदाच्या विधानसभेसाठी उमेदवारी देऊ नये, असा आग्रह कार्यकर्त्यांनी केला. ज्यांना आधीच जनतेने नाकारले आहे, त्यांना पुन्हा पुन्हा जनतेसमोर का पाठवता, असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.
हेही वाचा मुकुल वासनिक होणार काँग्रेसचे अध्यक्ष ? आज निर्णय
तसेच नागपूर पश्चिममधून उमेदवारी मागणारे नरेंद्र जिचकर यांनी राहुल गांधींनी इतर राज्यात राबवलेले प्रयोग महाराष्ट्रात राबवण्याची मागणी केली आहे. काँग्रेस श्रेष्ठींनी महाराष्ट्रात तिकीट वाटताना या निकषाची अंमलबजावणी केल्यास शहरातील काँग्रेसचे दिग्गज नेते सतीश चतुर्वेदी, अनिस अहमद, शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे असे अनेक नेते उमेदवारीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
हेही वाचा सेना-भाजपत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसाठी रस्सीखेच
तसेच २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने पराभूत झालेल्यांना यंदा तिकीट दिले जाऊ नये, अशीही मागणी होत आहे. त्यामुळे या मागणीनंतर काँग्रेस पक्षात नव्या वादाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.