नागपूर - नागपूर शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या संकल्पनेतून गुरुवारी नागपुरात जनता दरबाराच्या माध्यमातून तक्रार निवारण दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये स्वतः पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त, सर्व पोलीस उपायुक्त आणि सर्व पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सहभागी होणार आहेत.
हेही वाचा - नागपूर : इंधन दरवाढीच्या विरोधात विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने निदर्शने
महत्वाचे म्हणजे, ज्या नागरिकांना तक्रार द्यायची असेल त्यांना देखील या जनता दरबारात येऊन आपली तक्रार पोलीस आयुक्तांसमोर मांडता येणार आहे. एवढेच नव्हे तर दिलेल्या तक्रारींवर काय कारवाई झाली, या संदर्भात देखील 'ऑन द स्पॉट' सुनावणी केली जाणार आहे. नागपूरकरांसोबत उत्तम समन्वय निर्माण व्हावा या उद्देशाने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी तक्रार निवारण दिनाचे आयोजन केले आहे. यामध्ये ज्यांनी नोंदणी केली असेल अशांच्या तक्रारी तर ऐकल्या जातीलच शिवाय वेळेवर येणाऱ्या तक्रारींची नोंद देखील घेतली जाईल, अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली.
सर्वांचे म्हणणे ऐकले जाईल - आयुक्त अमितेश कुमार
जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारी सोडविताना प्रत्येकाचे म्हणणे गंभीरपणे ऐकून घेतले जाणार आहे. यामध्ये ज्यांनी कधी तक्रार दिली असेल त्यांच्या तक्रारीवर काय कारवाई झाली, यासंदर्भात संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून उत्तर मागितले जाईल. एवढेच नव्हे तर, काहीही गुन्हा नसताना विनाकारण पोलिसांकडून त्रास दिला जात असेल, अशा नागरिकांचे देखील गाऱ्हाणे ऐकून घेणार असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली. यामध्ये गुन्हेगारांना देखील आपली बाजू मांडण्याची संधी देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा - आधी प्रेम नंतर तिरस्कार; कुत्र्याच्या पिल्लाला गच्चीवरून फेकले