नागपूर - कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसागणिक झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. शासनाकडून कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करावे यासाठी प्रशासनाकडून विशेष काळजी घेतली जात आहे, या पार्श्वभूमीवर गणेश टेकडी परिसरात घेण्यात आलेला आढावा.
नागपूरात दररोज किमान 700 च्या घरात रुग्ण आढळून येत आहेत. शासनाकडून नागरिकांना वारंवार कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचना करण्यात येत आहेत. जे नागरिक कोरोना नियमांचे पालन करत नाहीत, त्यांच्याकडून दंड देखील आकारण्यात येत आहे. मात्र कोरोना बाबत नागरिक खरच गंभीर आहेत का? ते नियमांचे पालन करतात का? गणेश मंदिर टेकडी परिसरात याचा आढावा घेतला आहे. इटीव्ही भारतच्या प्रतिनिधिने.
नागरिक योग्य पद्धतीने मास्क घालत नाहीत
गणेश टेकडी मंदिर परिसरात केलेल्या पाहाणीमध्ये असे आढळून आले की, नागरिक मास्क घालून होते, मात्र मास्क ज्या पद्धतीने घातला पाहिजे त्या पद्धतीने तो नव्हता, काहींचे मास्क हे तोंडाखाली होते, तर काहींचे मास्क तोंडावर होते, मात्र नाक उघडेच होते, तर काही जणांनी मास्क घातलेच नव्हते, दरम्यान या परिसरात सॅनिटायझर मशिनची व्यवस्था करण्यात आली आहे, मात्र ते देखील बंदच होते. पुजा करण्यासाठी आलेल्या एका दाम्पत्याने देखील मास्क व्यवस्थित घातले नव्हते.
दाखवण्यासाठी कोरोनाच्या नियमांचे पालन?
तसेच मंदिराच्या बाहेर बसणाऱ्या पानं फुलं विक्रेत्यांनी देखील योग्य प्रकारे मास्क घातले नसल्याचे दिसून आले, फुले खरेदी करणाऱ्या एका ग्राहकाने आत्ताच मास्क पडले असे सांगत दुचाकीच्या डिकीमधून अंगावर घ्यायची शॉल बाहेर काढून तिचाच मास्क म्हणून उपयोग केला. दरम्यान यामुळे नागरिक केवळ दाखवण्यासाठी कोरोनाचे नियम पाळतात का असा प्रश्न निर्माण होत आहे.