नागपूर - राज्य शासनाने राज्यातील किराणा दुकाने व सुपर मार्केटमध्ये जीवनावश्यक वस्तूंप्रमाणेच वाईन (Wine Sales Super Market) विक्रीलाही परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, या निर्णयाचा नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्यावतीने (Nag Vidarbha Chamber of Commerce) विरोध करण्यात येत आहे. राज्य सरकारने हा निर्णय त्वरित रद्द करावा अशा आशयाच्या मागणीचे पत्र चेंबरकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लिहिण्यात आले आहे.
नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सकडून मागणी करण्यात आली आहे की जीवनावश्यक वस्तूंची विक्री आणि मद्य वस्तूंची विक्रीचे नियम हे वेगवेगळे असायला पाहिजे. राज्यात किराणा दुकाने बाजारपासून गल्लीपर्यंत आहेत, राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार वाईन किराणा दुकानातून सर्रासपणे उपलब्ध होईल, त्यामुळे सामान्य नागरिकांच्या कौटुंबिक जीवनावर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. यातून कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना देखील वाढू शकतात.
- नागरिकांच्या अडचणी वाढतील:-
सुपर मार्केट आणि किराणा दुकानात महिला आणि लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिक खरेदीला जात असतात. शासनाच्या नियमानुसार वाईन ही प्रत्येक किराणा दुकानात उपलब्ध होऊ लागली तर कोणीही न घाबरता ती खरेदी करू शकेल आणि त्याचा लहान मुलांवर आणि विशेष करून महिलांवर वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. या निर्णयाने राज्याच्या तिजोरीत वाढ होईल. मात्र, सामान्य नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागेल, अशी शंका नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांनी व्यक्त केली आहे.