नागपूर - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद विधानसभेनंतर महापालिका सभागृहात देखील बघायला मिळाले. शुक्रवारी नागपूर महानगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजपच्या सदस्यांनी 'मी पण सावरकर' लिहिलेल्या टोप्या घालून सभागृहात प्रवेश केला.
पाच दिवसांपूर्वी नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात भाजपच्या आमदारांनी देखील मी पण सावरकर लिहिलेल्या भगव्या टोप्या घालून सभागृहात प्रवेश केल्याने सत्ताधारी व विरोधकांत चांगलीच खडाजंगी झाली होती. आता त्यानंतर नागपूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही भाजप नगरसेवकांनी मी पण सावरकर लिहिलेल्या भगव्या रंगाच्या टोप्या घातल्याने सभेत गदारोळ झाला. तसेच भाजपची सत्ता असलेल्या नागपूर महापालिकेत काश्मीरमधून कलम 370 हटवण्यासंदर्भात व नागरिकत्व सुधारणा कायद्याबद्दल केंद्र सरकारचा अभिनंदन प्रस्ताव ठेवण्यात आला. ज्याला काँग्रेस नगरसेवकांनी विरोध करत सभात्याग केला.