नागपूर - गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. आता राज्यातील पूर हळूहळ ओसरू लागला आहे. पाऊस आणि दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये १७० लोकांना जीव गमवावा लागला आहे. मात्र आजपासून तीस वर्षांपूर्वी नागपूर जिल्ह्यातील मोवाड येथे आलेल्या महापुरात २०४ लोकांचा मृत्यू झाला होता. आज या घटनेला ३० वर्षे पूर्ण झाली असली तरी जखमा मात्र आजही ताज्या आहेत.
मोवाड हे गाव महाराष्टाच्या शेवटच्या टोकावर मध्यप्रदेशच्या सीमेवर वसलेले आहे. मोवाड हे नरखेड तालुक्यातील गाव असून वर्धा नदीच्या काठावर हे गाव आहे. मोवाड नगरपालिकेची स्थापना १७ मे १८६७ ला झाली. त्याला १५४ वर्षे पूर्ण झाली आहेत. येथील नगरपरिषद, स्वातंत्र्य संग्रामांचा इतिहास, चलेजाव आंदोलन खूप प्रसिद्ध होते. मोवाडचा बैलबाजार देखील प्रसिद्ध आहे. येथे संत्रा आणि कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न होत असे, मात्र महापुराच्या त्रासदीनंतर आज मोवाडमध्ये सर्व काही बदलेले आहे. ३० जुलै १९९१ ला हा महापूर आला होता.
रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी, नाले तुडुंब भरून वाहत होते. सूर्य उजडण्याच्या आधीच संपूर्ण मोवाड गाव जलमग्न झाले होते. कुणालाही सावरण्याची साधी संधी सुद्धा मिळाली नव्हती. त्या दिवशी मोवाडवासीयांनी पाहिल्यांदा वर्धा नदीचे रोद्र रूप बघायला मिळाले होते. त्यानंतर या गावाने अनेक पूर अनुभवले आहेत. मात्र १९९१ च्या महापूराने दिलेल्या असंख्य वेदना आजही कायम आहेत. खवळलेल्या नदीने हजारोंच्या डोळ्यादेखत आपल्या स्नेही जणांना महापुराने कवेत घेत असल्याचे दृश्य आजही अनेकांच्या मनात ताजे आहे.
एकाच रात्री आलेल्या महापुराने होत्याचे नव्होते केले होते. वर्धा नदीच्या काठावर वसलेल्या १२ गावांवर वर्धा नदी कोपली होती. या घटनेत मोवाड येथील २०४ जणांना गिळंकृत केले होते. आज या घटनेला ३० वर्षे लोटली. परंतु जर पूर हा शब्द जरी उच्चारला तरी अंगावर शहारे उभे राहतात.