नागपूर - सारथी संदर्भात जे आरोप केले जात आहेत, ते चुकीचे असून यासंदर्भात राजकारण केलं जातं असल्याचा आरोप मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला. सारथी बंद करण्यासंदर्भांत जे आरोप माझ्यावर केले, त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे ते म्हणाले. मराठा समाजाला वाटत असले, तर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घ्यावी आणि माझ्याकडून हे खातं काढून घेण्याची मागणी करावी, मराठा समाजातील एखाद्या मंत्र्यांकडे सारथीची जबाबदारी द्यावी, असं वक्तव्य त्यांनी केले आहे.
कोरोना आणि इतर काही कारणांमुळे शिष्यवृत्तीचे पैसे देण्यास उशीर होतो. मी ओबीसी आहे, म्हणून जाणीवपूर्वक उशीर होतो हा आरोप करणे चुकीचा आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे सारथी संदर्भांत माझ्याकडे कोणताही थेट अधिकार नाही. नियोजनाच्यावर खर्चाची रक्कम जात असेल, तर ती फायनान्स विभागाकडे पाठवणे एवढाच माझा अधिकार असल्याचे ते म्हणाले आहेत. मी सारथी बंद करायला निघालो आहे, हे म्हणणे चुकीचे असून या मागे राजकारण सुरू असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले आहे.
ज्या योजना सारथीच्या माध्यमातून सुरू आहेत, त्याची व्याप्ती आणखी वाढवण्याचा माझा प्रयत्न आहे. मी ओबीसी आहे, म्हणून माझा सारथीला विरोध असण्याचे कोणतेही कारण नसताना विरोधकांकडून नाहक भ्रम पसरवला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या संदर्भात मराठा क्रांती मोर्चाने मुख्यमंत्री यांची भेट घ्यावी, आपल्याला सारथीचे प्रमुख नको, ते दुसऱ्याला द्यावं असंही वडेट्टीवार म्हणाले.