नागपूर - नर्मदा बचाव आंदोलनासाठी 259 दिवसांपासून संत सद्गुरू भय्याजी सरकार यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. यात त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना नागपूरच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती सध्या ठीक असल्याची माहिती मिळत आहे.
नर्मदा नदीच्या जवळपास असलेल्या 300 मीटरच्या कॅचमेन्ट परिसरात सुरू असलेल्या अवैध उत्खनन विरोधात भय्याजी सरकार यांचे अन्नत्याग आंदोलन मागील 9 महिन्यांपासून सुरू आहे. नर्मदा नदीच्या काठच्या परिसरात असलेले जंगल जमीन वाचवण्यासाठी त्यांनी ही भूमिका घेतली आहे. या नर्मदा नदीच्या काठावर उत्खनन सुरू असून त्यापासून पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे. यामुळे या भागाचे संरक्षण करावे, अशी मागणी भय्याजी सरकार यांच्याकडून केली जात आहे.
केवळ नर्मदेचे पाणी पिऊन सुरू आहे सत्याग्रह
मध्यप्रदेश जबलपूर शहरात त्यांनी 17 ऑक्टोबर 2012 पासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या काळात अन्न, फळ, त्याग करून त्यांनी याला 'सत्याग्रह' असे नाव दिले. केवळ नर्मदेचे पाणी पिऊन त्यांचा हा उपवास सुरू आहे. यापूर्वी त्यांनी तीन मागण्यांना घेऊन 18 महिन्यांचा अन्नत्याग सत्याग्रह केल्याचे सांगितले जात आहे. आतापर्यंतच्या जल, जमीन आणि वृक्ष संरक्षणसाठी सर्वात मोठे अन्नत्याग आंदोलन असल्याचे बोलले जात आहे.
नर्मदेच्या नदीकाठच्या परिसरात निर्माण आणि उत्खनन सुरू असल्याचा आरोप
यात मध्यप्रदेशच्या सरकारकडून या भागात होत असलेल्या अवैध उत्खनन करणाऱ्या विरोधात कुठलीच ठोस कारवाई करण्यात आली नाही. या विरोधात उच्च न्यायालयात याचीका टाकण्यात आली होती. ज्यामध्ये नदीच्या संरक्षण क्षेत्रापासून 300 मीटरच्या परिसरात कुठलेही निर्माणकार्य केल्या जाऊ नये, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले असल्याचे संगीतले जात आहे. पण यानंतरही परिसरात अतिक्रमण करून उत्खनन, वृक्षतोड सातत्याने सुरू आहे.
2010 मध्ये दिला नर्मदा बचाओचा नारा
याच विरोधात संत भय्याजी सरकार यांनी नर्मदा बचाओचा नारा देत मागील 11 वर्षांपासून आंदोलन उभारले आहे. 12 जानेवारी 2010 नर्मदा मिशनची स्थापना केली होती. याच दरम्यान त्यांनी गावोगावी जाऊन नागरिकांमध्ये जनजागृती केली आहे. यात लोकांचा सहभाग मिळवण्यासाठी मोहीम राबवली. पण मध्यप्रदेश सरकार, तसेच स्थानिक प्रशासनाच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. मागील 259 दिवसांपासून अन्नत्याग करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचे काम निरंतर सुरू आहे. नर्मदा ही नदी नसून आई आहे, मध्यप्रदेश महाराष्ट्र, गुजरात राज्यातील अनेक शेतकऱ्यांना पिकासाठी, पिण्याची पाणी अनेकांची तहान नर्मदेतून भागवली जात आहे. याच जगण्याचा आधार असलेल्या नर्मदेला वाचवण्यासाठीचा अन्नत्याग आंदोलन सुरू असल्याचा दावा केला जात आहे.
वृक्ष रोपटे लावून नोंदवले रेकॉर्ड
नर्मदा नदीच्या काठावर संत भय्याजी सरकार यांचे शिष्य यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोपटे लागवड सुद्धा करण्यात आली आहे. या रोपटे लागवडीची नोंद गोल्डन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. जवळपास 31 हजार लोकांनी 35 किलोमीटर पायदळ चालत जवळपास 50 हजारांच्या घरात रोपटे लावत मोहीम राबवली होती.
संत भय्याजी सरकार यांची प्रतिक्रिया...
लाखो लोकांची जीवनदायी असलेल्या नर्मदेचे अस्तित्व विकासाच्या नावावर नष्ट करण्याचे काम सुरू आहे. मध्य भारताच्या जल, जमीन, वृक्ष, पाणी जीवक्षेत्र आहे. पण मागील नर्मदेसोबतच काही काळात 80 टक्क्यांसह नद्यांचे अस्तिव धोक्यात आले आहे. अशा या परिस्थितीमुळे मोठया प्रमाणात नैसर्गिक आपत्ती होत आहे, पण त्याचे मूळ कारण हे नैसर्गिक संपदेचे होत असलेले अतिक्रम आहे. यात जवाबदार लोकांकडून याचे सरंक्षण झाले पाहिजे, न्यायालयाचे आदेशाचे पालन झाले पाहिजे यासाठी आंदोलन सुरू आहे. निसर्गाचे संरक्षण करण्याऐवजी धोका पोहचवण्याचे काम पुंजीपती आणि माफियाकडून सूरु असल्याची प्रतिक्रिया दवाखान्यात उपचार घेताना संत भय्याजी सरकार यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.
हेही वाचा - 'कयामत से कयामत तक' म्हणणाऱ्या फिल्मी हिरोचा पहिला विवाह टिकला 16, तर दुसरा 15 वर्षे