नागपूर - नागपूरकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मेट्रोच्या दोन आणि चार या मार्गिकेवरील निर्माणाचे कार्य ९८ टक्के पूर्ण झाले असून मेट्रो स्टेशन देखील तयार झाले आहेत. केवळ २ टक्के काम शिल्लक राहिले असून अवघ्या दहा दिवसांमध्ये ते देखील काम पूर्ण केले जाईल. त्यानंतर आवश्यक त्या सुरक्षा चाचण्या केल्यानंतर मेट्रोत प्रवासी वाहतूक सुरू करण्याची परवानगी प्राप्त होताच या दोन्ही मार्गांवर मेट्रो धावणास सुरुवात होणार आहे. या प्रक्रियेला साधारणपणे महिनाभराचा कालावधी जाईल. त्यामुळे शक्यतोवर पुढील महिन्यात या दोन्ही मार्गांचे विधिवत उद्घाटन होऊन या मार्गावर मेट्रोची प्रवासी ( Nagpur Metro ) वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे.
सार्वजनिक वाहतूक सेवेच्या दृष्टीने गेल्या वर्षभरात नागपूरच्या नागरिकांचा कल मेट्रोकडे असल्याचे दिसून येत आहे. सुमारे दीड वर्षांपूर्वी मेट्रोच्या रिच-१ म्हणजेच सीताबर्डी इंटरचेंज ते रिच-३ सीताबर्डी इंटरचेंज ते हिंगणा या दोन मार्गांवर मेट्रोची सेवा सुरू झाली आहे. या दोन्ही मार्गावर नागपूरकरांनी उदंड असा प्रतिसाद दिल्याने रिच-२ सीताबर्डी इंटरचेंज ते प्रजापती नगर पारडी आणि रिच-४ म्हणणे सीताबर्डी इंटरचेंज ते ऑटोमोटिव्ह चौक कामठी या उर्वरित दोन मार्गांवर प्रवासी वाहतूक सेवा केंव्हा सुरू होईल, असा प्रश्न विचारला जात होता.
सात वर्षात मेट्रोने रचला इतिहास : केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने २०१५ साली नागपुरात मेट्रोच्या कामाला सुरुवात झाली होती. सात वर्षाच्या काळात नागपूरच्या चारही बाजूला मेट्रो धावत आहे. त्यामुळे मेट्रोने कमी वेळेत काम पूर्ण केले आहे.