नागपूर - कोरोना काळातही कसेबसे व्यापाऱ्यांना दुकाने सुरू करण्यास मुभा मिळाली. परंतु स्थानिक प्रशासनाकडून कडक निर्बंध देखील लावण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर नागपुरातही बाजारपेठांबाबत स्थानिक प्रशासनाकडून विविध नियम लावण्यात येत आहेत. याचाच विरोध म्हणून नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स व व्यापारी संघटनाकडून उद्या बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मनमानी व रोज बदलणाऱ्या नवनवीन नियमांमुळे त्रस्त असल्याचे सांगत या नियमांना विरोध म्हणून हा बंद पुकारण्यात आल्याचे व्यापारी संघटनाकडून सांगण्यात आले. शिवाय आयुक्तांनी काढलेले आदेश रद्द करण्यात यावे अशीही मागणी व्यापारी करत आहेत.
देशात लॉकडाऊन नंतर अनलॉक करण्यात आले. नियमानुसार शिथिलता देत दुकाने देखील उघडण्याची मुभा व्यापाऱ्यांना देण्यात आले. असे असले तरी दुकाने उघडण्याबाबतच्या नियमावलीचा भार स्थानिक प्रशासनावर सोपवण्यात आला. त्यानुसार दुकानांबाबत नियम तयार करत बाजारपेठा सुरू आहेत. परंतु नागपुरात मात्र मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून शहरातील दुकानांबाबत लावण्यात आलेल्या नियमांना व्यापारी संघटनाकडून विरोध होत आहे.
याच पार्श्वभूमीवर उद्या शहरातील सर्व बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयुक्त तुकाराम मुंढे हे रोज नवनवीन नियम लावत मनमानी करत असल्याचा आरोपही व्यापारी संघटनाकडून करण्यात आला आहे. विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स व व्यापारी संघटनांतर्फे हा बंद पुकारण्यात आला आहे. कोरोनामुळे आधीच बाजारपेठा ठप्प आहेत. अशात दररोज दुकानांसाठी नवनवीन नियम, त्यामुळे व्यापारी त्रस्त झाल्याचे यावेळी व्यापारी संघटनांकडून सांगण्यात आले. शिवाय शहरातील दुकानांबाबत सम-विषम पद्धती देखील बंद करा, अशी मागणीही व्यापारी संघटनानी केली आहे.
मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी अनिवार्य केली आहे. त्यामुळे याही निर्णयाला व्यापाऱ्यांनी विरोध करत, कोरोना चाचणी अनिवार्य का? असा सवालही उपस्थित केला आहे. त्यामुळे आयुक्तांकडून सुरू असलेला मनमानी कारभार थांबवा म्हणून बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही चेंबर ऑफ कॉमर्स आणि व्यापारी संघटनांनी सांगितले. शिवाय दररोज लादल्या जाणारे नियम तात्काळ थांबवण्यात यावे, अशी मागणीही व्यापारी संघटनांनी केली आहे.