नागपूर : शहरातील मानकापूर येथील प्रसिद्ध ॲलेक्सिस रुग्णालयामध्ये अपात्र डॉक्टरांकडून सोनोग्राफी करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. त्यामुळे, गर्भधारणापूर्व आणि प्रसव पूर्व निदान तंत्रे (लिंग निवड प्रतिबंधक) अधिनियम (पीसीपीएनडीटी) कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी या रुग्णालयावर कारवाई करण्यात आली आहे.
महानगरपालिकेच्या पीसीपीएनडीटी समितीमार्फत करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये रुग्णालयातील सोनोग्राफी, इको, व्हॅन फाईडर आणि अन्य अशा एकूण सात मशीन जप्त करण्यात आल्या आहेत. पीसीपीएनडीटी समितीच्या बैठकीमध्ये या विषयावर चर्चा करण्यात आली होती, शिवाय समितीच्या सदस्यांनी तक्रारकर्त्यांसोबत देखील चर्चा केली. त्यानंतर समिती सदस्यांनी या गंभीर प्रकाराची दखल घेत रुग्णालयातील सर्व मशीन आणि रेकॉर्ड जप्त करण्याचा निर्णय घेतला.
जप्त केलेल्या रेकॉर्डची तपासणी करुन पुढील कारवाई करण्यात येईल असे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा : देवेंद्र फडणवीसांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात; सुदैवाने कोणालाही दुखापत नाही..