नागपूर - विदर्भाच्या जंगलांना आणि त्यातील वनसंपदेला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देणारे, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वनअभ्यासक, अरण्यऋषी म्हणून ओळखले जाणारे मारुती चितमपल्ली यांनी आज विदर्भाच्या जागांलाच निरोप घेतला आहे. त्यांचा पुढील पत्ता असेल सोलापूर, ते आता पुढील जीवन तिथेच घालवणार आहेत. नागपूरसह विदर्भाचा निरोप घेताना त्यांना गहिवरून आले होते. आपल्या नेमक्या भावना आज या क्षणाला व्यक्त करणे शक्य नसले, तरी विदर्भातील जंगलांमुळे मला जीवनातील ४५ वर्ष समृद्ध जीवन जगता आल्याचे त्यांनी बोलून दाखवले आहे. विदर्भाच्या जंगलात रमताना मारुती चितमपल्ली यांनी जंगल आणि जंगलातील जीवन यावर विपूल लेखन केलेले आहे. जंगलात भटकंती करताना त्यांचा अभ्यास आणि त्यातून निर्माण झालेले साहित्य हे विदर्भाच्या जंगलांना समृद्ध करण्यासाठी पुरेशे आहेत. आज मारुती चितमपल्ली हे सोलापुरात स्थायिक होणार असले तरी विदर्भाची वन संपदा पोरकी झाली आहे.
मारुती चितमपल्ली यांचे नाव कानी आले की विदर्भाच्या जंगलांचा उल्लेख होणे, हे समीकरणच झाले आहे. मारुती चितमपल्ली हे शासकीय वन विभागात काम करताना विदर्भाच्या जंगलात इतके रमले की, आज वयाच्या या टप्यावर सुद्धा त्यांना प्रत्येक जंगलाचे वैशिष्ट्य तोंडपाठ माहिती आहे. कुठल्या जंगलात काय आहे आणि कसे आहे? याचे बारकावे त्यांच्या आजही स्मरणात आहेत. आज विदर्भाचा निरोप घेताना त्यांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या आहेत. 'विदर्भाच्या जंगलात ४५ वर्ष रमलो तेव्हा आदिवासी भाषा शिकण्याचे भाग्य लागले, त्यामुळेच मी मराठी भाषेला एक लाख शब्द देऊ शकलो' असे ते म्हणाले आहेत. हे शब्द मराठीच्या पुस्तकांमध्ये शोधले तर ते सापडणार नाहीत. मात्र, विदर्भाच्या जंगलातील आदिवासी लोकांच्या तोंडात ते शब्द आहेत. माझा लेखन प्रवास कसा सुरू झाला हे सांगताना ते म्हणाले की, अगदी लहान वयात मला डायरी लिहिण्याची सवय जडली होती, त्यामुळे मी आज वन साहित्याची रचना करू शकलो आहे. पहाटे तीन वाजता उठून सलग पाच तास लेखन करायचो, अशी माहितीही त्यांनी दिली.
हेही वाचा - 24 तास ऑक्सिजन देणारे पिंपळकुळातील झाडे लावा; मारुती चितमपल्ली यांचे आवाहन
नवेगाव, नागझिरा आणि मेळघाटात असलेली वनसंपदा विपुल आहे, त्याचे लेखन बरेच शिल्लक राहिले आहे. मात्र, आता वयोमानाच्या मर्यादेपुढे जंगलात भ्रमंती करण्याची ऊर्जा नाही, तरी माझ्याकडे असलेल्या डायऱ्यांच्या मदतीने लेखन सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पक्षी कोष तयार झाल्यानंतर तो प्रसिद्ध झाला, त्यानंतर आता प्राणी कोष देखील तयार झाला असून एखाद वर्षात तो देखील प्रसिद्ध होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मत्स्य आणि वृक्ष कोष तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे मारुती चितमपल्ली म्हणाले आहेत. आज विदर्भ सोडताना मला माझ्या भावना बोलून दाखवता येत नाहीत. मात्र, विदर्भातील जंगलांनी मला माझ्या जीवनातील ४५ वर्ष समृद्ध जीवन जगण्याची ऊर्जा दिली अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा - बोदलकसावासियांनी अनुभवला 'केशराचा पाऊस'...पक्षी मित्र मारुती चितमपल्लींच्या कार्यक्रमात रंगले निसर्गप्रेमी