नागपूर - श्रीनगरच्या गुरेज सेक्टरमध्ये पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाला प्रत्युत्तर देताना मराठा रेजिमेंटचे जवान भूषण सतई यांना वीरमरण आले होते. १३ नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. भूषण हे काटोल येथील रहिवासी आहेत. आज त्यांचं पार्थिव नागपूरात दाखल झालं. सोनेगाव येथे असलेल्या वायुसेनेच्या बेस कॅम्प वरून पार्थिव कामठी येथील सैन्य कॅम्पसाठी रवाना झाले आहे. आज रात्री हे पार्थिव याच ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर उद्या काटोल येथे भूषण यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
दोन दिवसांपासून पाकिस्तानकडून गुरेंज सेक्टरमध्ये सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू असल्याने पार्थिव हलवणे शक्य नव्हते. मात्र त्यानंतर हे पार्थिव श्रीनगर येथे आणण्यात आले. त्याठिकाणी सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर वायुसेनेच्या विशेष विमानाने भूषणचे पार्थिव दिल्लीत आणले. त्या ठिकाणी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शूर जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.
यानंतर पार्थिव नागपूरसाठी रवाना करण्यात आले. भूषणचे पार्थिव नागपूरला आणल्यानंतर ते कामठी येथील कॅम्प परिसर ठेवण्यात आले आहे. त्या ठिकाणी सलामी दिल्यानंतर उद्या सकाळी भूषणचे पार्थिव त्याच्या मूळ गावी काटोल येथे घेऊन जाण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
वयाच्या विसाव्या वर्षीच सैन्यात दाखल
पाकिस्तानी सैन्याने केलेल्या भ्याड हल्ल्यात वीरमरण आलेल्या भूषण सतई यांच्या पार्थिवावर उद्या जिल्ह्यातील काटोल येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. भूषण हा काटोल येथील रहिवासी असून त्याचे संपूर्ण शिक्षण त्याच ठिकाणी झाले आहे. भूषण सवई हे वयाच्या विसाव्या वर्षी भारतीय सैन्यात रुजू झाले होते. महाविद्यालयात असल्यापासूनच भूषण यांनी सैन्यात रुजू होण्यासाठी तयारी केली होती. शुक्रवारी दुपारी गुरेज सेक्टर येथे भूषण कार्यरत असताना पाकिस्तानी लष्कराने केरेन सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. त्यावेळी भारतीय जवानांनी शत्रूला जोरदार प्रत्युत्तर दिले. यावेळी भूषण यांना वीरमरण आले आहे.
कोल्हापूरच्या जवानालाही वीरमरण
पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात कोल्हापूरच्या आजरा तालुक्यातील बहिरेवाडी येथील जवानालाही वीरमरण आले आहे. ऋषीकेश रामचंद्र जोंधळे (वय 20) असे वीरमरण आलेल्या जवानाचे नाव आहे.