नागपूर - महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचे खाते वाटप झाले असून आता मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशन झाल्यावर दुसऱ्या दिवशी म्हणजे २३ डिसेंबर रोजी हा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा - राज्यातील खासगी शाळांमधून कला शिक्षक होणार कायमचे हद्दपार?
सध्या ठाकरे सरकारमधील ६ मंत्र्यांकडे ४४ खात्याचे वाटप करण्यात आले आहेत. आता या आधारावर हिवाळी अधिवेशनात प्रश्नोत्तरांना मंत्री सामोरे जाणार आहेत. पण हे अधिवेशन संपल्यावर तत्काळ दुसऱ्याच दिवशी मुंबईत मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, राज भवनावर हा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. सध्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या प्रत्येकी दोन जणांना मंत्रीपदे वाटप करण्यात आली आहेत. पण काँग्रेसचा विचार केला तर विजय वड्डेटीवार, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांना कोणती मंत्रीपदे मिळणार याकडे सर्वांची लक्ष लागून राहिले आहे. तसेच शिवसेनेच्या संदर्भात विचार केला तर गेल्या मंत्रिमंडळात विधान परिषदेतील आमदारांकडे सर्वाधिक मंत्रीपदे होती. त्यात आता नवीन चेहऱ्यांना संधी मिळते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
हेही वाचा - या देशात सामान्यांचे जगणे महाग आणि मरण स्वस्त झालंय ! शिवसेनेची केंद्र सरकारवर टीका
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्रीपद आणि इतर मंत्रिपदाची वाटप होणे बाकी आहे. त्यात अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड यांना कोणती मंत्रिपदे मिळतात याकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. सध्या तात्पुरते खाते वाटप करण्यात आले असून यात बदल होणार आहेत. त्यात अनेक मंत्र्यांचा समावेश होणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, प्रत्येक पक्षाच्या वाट्याला असलेली एक किंवा दोन मंत्रिपदे रिक्त ठेवण्यात येणार आहे. आघाडी सरकारच्या काळात असेच करण्यात आले होते. तो फॉर्म्युला यंदाही लागू करणार असल्याचे निश्चित झाले आहे.