नागपूर - स्वतंत्र भारतात ऑलम्पिक स्पर्धेत पहिले वैयक्तिक पदक हे महाराष्ट्राचे कुस्तीगीर खाशाबा जाधव यांनी मिळवून दिले. सध्याच्या घडिला मात्र खेळाच्या बाबतीत महाराष्ट्र इतर राज्याच्या तुलनेत मागे पडताना दिसून येत आहे. यंदा जपानची राजधानी टोकियोमध्ये होत असलेल्या ऑलम्पिक स्पर्धेत महाराष्ट्राच्या म्हणजे 12 कोटी लोकसंख्येतून 8 खेळाडू प्रतिनिधित्व करत आहेत. हरियाणा, पंजाब, तामिळनाडू या राज्याच्या तुलना करताना महाराष्ट्रातून राज्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत केवळ 4 टक्के खेळांडूंचा ऑलम्पिकमध्ये सहभाग आहे. त्यात उपराजधानी नागपूरसारख्या महानगराची परिस्थिती आणखी खराब आहे. त्या पार्श्वभूमीवर नागपुरच्या क्रीडा धोरणांचा घेतलेला हा विशेष आढावा..
उपराजधानी नागपूरचे धावपटू राजीव बालकृष्णन यांनी नागपुरातील पहिले ऑलम्पिक पदक जिकले होते. हे पदक त्यांच्या कठोर परिश्रमाचे फळ होते. पण सध्याच्या घडीला ऑलम्पिकचा विचार केल्यास त्या धर्तीवर पायाभूत सोयीसुविधा खेळाडूंना उपलब्ध होणे अपेक्षित होत असताना पण त्या होऊ शकल्या नाहीत. यामुळे आजची परिस्थिती क्रीडा क्षेत्राची नक्कीच दयनीय आणि विचार करण्यास भाग पडणारी आहे. शिवाय महाराष्ट्रा सारख्या लढवय्या राज्याच्या इतिहासाला साजेशी नक्कीच नाही.
खेळाडू घडू शकतात पण घडवणारे प्रशिक्षक नाही-
ऑलम्पिक दर्जाचे आपल्याकडे खेळाडू नाही का? असा प्रश्न केल्यास त्याचे उत्तर म्हणजे खेळाडू आहे. पण आपण मागे का पडलो याचे अवलोकन केल्यास ऑलम्पिकसाठी क्रीडा क्षेत्रासाठी पाहिजे ते धोरण, वातावरण मागील काळात निर्माण झाले नाही. महाराष्ट्रातील काही खेळाडूंनी स्वकर्तृत्व दाखवले. तेच त्यांना योग्य वेळी प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळाले असते तर क्रीडा क्षेत्रातील कामगिरीची आजची परिस्थिती वेगळी असती. जिथे केवळ राज्याच्या नेमक्या दोन चार शहरात असलेले क्रीडा कल्चर किमान महानगरात नक्कीच पोहोचले असते, अशी भावना क्रीडाप्रेमीमधून व्यक्त केली जात आहे. तसेच भविष्याचा अंदाज घेऊन आजपासून तयारी केल्यास पुढील 8 ते 10 वर्षात यात सकारात्मक बदल दिसायला सुरुवात होईल हे नाकारले जाऊ शकत नाही, असे मतही काही क्रीडा प्रशिक्षकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
खेळांडूसाठी सोयी सुविधांचा अभाव-
नागपुरात खेळाडूंना ऑलम्पिक दर्जाच्या सोयीसुविधा उपलब्ध होत नाहीत. नागपुरात खेळल्या जाणाऱ्या खेळापैकी ऑलम्पिकमध्ये सहभाग होऊ शकेल असे खेळ म्हणजे बॅडमिंटन, बास्केटबॉल, आणि अॅथेलेटिक आहेत. यासाठी खेळाडू परिश्रम घेताना दिसून येतात. मात्र या खेळाडूंना योग्य सोयी सुविधा आणि प्रशिक्षण मिळत नसल्याची खंत क्रीडापटूमधून व्यक्त केली जाते.
नागपुरात उपलब्ध तरी काय आहे-
उपराजधानी नागपूरचा विचार केल्यास मानकापूरला आंतरराष्ट्रीय दर्जाचे इंडोअर स्टेडियम आहे. याठिकाणी सिंथेटिक ट्रॅक बनून बरेच वर्ष झाले. मात्र त्याची सध्या दूरवस्था झाली असून तो दुरुस्त करण्याची गरज आहे. बॅडमिंटन, बास्केटबॉल आणि अॅथलेटिक या तीन खेळासाठी खेळाडू आहेत. त्यांना लागणाऱ्या ऑलम्पिक दर्जाच्या सोयी सुविधा उपलब्ध नाहीत. असे असले तर परिस्थितीतही खेळाडू आपले यश संपादन करण्याचा प्रयत्न करत आहेत. नुकत्याच पोलंड येथे झालेल्या वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये नागपूरची अलफिया पठाण हिने सूवर्ण पदक मिळवले असून ती इथेच मानाकापूरच्या मैदानावर तयार झाली आहे. पुढील उद्दिष्ट ऑलम्पिकमध्ये सहभागी होणे आहे.
ऑलम्पिकच्या अनुषंगाने नागपूर विद्यापीठाचा पुढाकार -
राष्ट्रीय खेळ प्राधिककरण अंतर्गत नागपूर विद्यापीठात ऑलम्पिक स्पर्धाच्या दृष्टीने लक्ष ठेवून तयारीला सुरुवात झाली आहे. या माध्यमातून क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंची कामगिरी सुधारावी यासाठी पाऊले टाकायला सुरुवात झाली आहे. याचाच भाग म्हणून नागापूर विद्यपीठाच्या मैदानवर आठ कोटी खर्चून सिंथेटिक ट्रॅक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून तयार होणार आहे. यासोबतच वाठोडा येथे स्पोर्ट अथॉर्टी ऑफ इंडिया(एसएआय- साई) नागपूर विद्यापीठाच्या क्रीडा संकुलनात क्रीडा प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. यामाध्यमातून खेळाडूंना प्रोत्साहन तसेच बॅडमिंटन आणि बास्केटबॉल यासाठी तज्ज्ञ कोचेसचे मार्गदर्शन मिळू लागले आहे. पण हे सेंटर मिळायला मोठा संघर्ष करावा लागला हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे.
यासोबत नागपूर विद्यापीठाच्या क्रीडांगणात सुभेदार क्रीडा गृहात बॅडमिंटनसाठी सोयी आहे. यासोबत बास्केटबॉलमध्ये सुद्धा खेळाडू मेहनत घेत आहे. यामुळे याचा फायदा येत्या काळात ऑलम्पिक स्पर्धेत प्रतिनिधित्व करण्यासाठी होणार आहे. खेळाडूंमध्ये वातावरणात निर्मितीसाठी त्यांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षण सोबत त्यांना या स्पर्धेत टिकण्यासाठी लागणारे कौशल्य आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. एकाच वेळी वेगवेगळे 10 खेळ खेळता येईल असे इनडोअर स्टेडियम उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. पण यासोबत महत्वाचे म्हणजे चांगले अनुभवी प्रशिक्षक यावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे नागपूर विद्यापीठाचे शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शरद सुर्यवंशी ईटीव्ही भारताशी बोलताना क्रीडा क्षेत्रातील वास्तविक परिस्थितीची मांडणी केली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नाने वातावरण निर्मिती-
नागपुरात मागील काही वर्षात केंद्रीय मंत्री यांच्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून जवळपास सर्व खेळांना चांगले दिवस आले आहेथ. 6700 वेगवेगळ्या खेळाच्या मॅचेस आणि 30 हजार खेळाडू यामध्ये या स्पर्धेत सहभाग घेतात. यामुळे एकदम ऑलम्पिक नाही पण स्पर्धांमुळे खेळाडूंना प्रोत्साहन मिळू लागले आहे. यातुन क्रीडा वातावरण निर्मितीला एक प्रकारे सुरुवात झाली आहे. पण कोरोनेच्या माहामारीने यात खंड पडला आहे. पण एकेकाळी भाऊ काणे, यांच्यासह अरुंधती पानतावणे या खेळाडूंनी आंतराष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. यासह अनेक खेळाडू घडले आहेत. अनेक खेळाडू घडण्याच्या मार्गावर आहेत. पण योग्य कोच आणि मार्गदर्शन सोयी सुविधा मिळणे गरजेचे असल्याचे मत क्रीडा क्षेत्रातून व्यक्त केले जात आहे.
लोकसंख्येच्या तुलनेत काय परिस्थिती-
भारत हा 130 कोटींचा देश असून केवळ 126 खेळाडू हे ऑलम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. चीनसारख्या देशाने मागून येऊन क्रीडा क्षेत्रात कामगिरी सिद्ध केली आहे. पण भारताचे क्रीडा धोरण आणि खेळावर लक्ष केंद्रित होण्यास मागे राहिलो आहे. यासोबत राज्याचे धोरण पाहता हरियाणा राज्यातील सर्वाधिक खेळाडू 31 लोकसंख्येच्या तुलनेत 24.4 टक्के आहे. दुसऱ्या स्थानावर पंजाब असून त्या राज्यातून 19, तामिळनाडू सारख्या छोट्या राज्यातून 8, केरळ 8, असे खेळाडू तेच महाराष्ट्रातून 8 खेळाडू ऑलम्पिक मध्ये गेले आहेत. यामुळे ही इतर राज्याच्या तुलनेत असलेली तफावत पाहता राज्याचे क्रीडा धोरण सुधारणे गरजेचे आहे. यासाठी राजकीय ईच्छाशक्ती आणि क्रीडा वृत्ती दोन्हीची गरज आहे. तर आणि तरच पुढील आठ ते 10 वर्षात ऑलम्पिकमध्ये ही परिस्थिती सुधारेल, अशी अपेक्षाही क्रीडा क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.