नागपूर - जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या संकल्पनेतून महानिर्मित 'मिशन ऑक्सिजन'च्या दुसऱ्या टप्प्यातील 35 घनमीटर प्रती तास क्षमतेच्या ऑक्सिजन प्लांटचे सोमवारी कामठी येथील उपजिल्हा रुग्णालयात लोकार्पण करण्यात आले. अत्यंत कमी कालावधीमध्ये हा प्लांट सुरू करण्यात आल्याने महानिर्मितीच्या खापरखेडा वीज केंद्र आणि मुंबई येथील संबंधित समस्त अधिकाऱ्यांचे अभिनंदनही पालकमंत्री यांनीं केले.
हेही वाचा - गोंदिया जिल्ह्यात खरीप हंगामाच्या धानाची उचल न झाल्याने रब्बी पिकांची खरेदी अडकली
या प्लांटमधून दररोज किमाम 65 ते 70 रूग्णांना किमान 95 टक्के एवढ्या शुद्धतेचा प्राणवायू उपलब्ध होणार आहे. यासाठी लागणारे कॉम्प्रेसर हे जपानवरून मागवण्यात आले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या अनुभवा नंतर तिसऱ्या लाटेची गरज लक्षात घेता नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे काम सुरू आहे.
प्रेशर स्विंग ॲडसॉर्पशन (पीएसए) तंत्रज्ञानावर आधारित असलेला हा ऑक्सीजन प्लांट नागपूर ग्रामीण मधील पहिलाच प्लांट आहे. महानिर्मितीचे संचालक चंद्रकांत थोटवे यांच्या मार्गदर्शनाखाली खापरखेडा वीज केंद्राच्या टिमच्या परिश्रम घेऊन अवघ्या 18 दिवसात काम पूर्णत्वास नेला आहे. मुख्य अभियंता राजू घुगे, उपमुख्य अभियंता शरद भगत, प्रभारी उपमुख्य अभियंता डॉ. अनिल काठोये, हेमंत टेंभरे, मे. ओरायपल, मेसर्स अबु कन्स्ट्रक्शन यांनी परिश्रम घेतले आहे.
हेही वाचा - देवेंद्र फडणवीसांनी घेतली शरद पवारांची भेट, दोन्ही नेत्यांमध्ये विविध मुद्यांवर चर्चा
पहिल्या टप्प्यात अंबेजोगाई येथील रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात प्रतिदिन २८८ जम्बो सिलेंडर क्षमतेचा ९५.२ टक्के शुद्धतेचा ऑक्सिजन प्लांट २७ एप्रिलला सुरू झाला होता. यात दुसऱ्या टप्प्यातील खापरखेडा वीज केंद्रामार्फत उपजिल्हा रुग्णालय कामठी येथे आज लोकार्पण झाले, तर परळी वीज केंद्रामार्फत जिल्हा रुग्णालय परभणी येथे, पारस वीज केंद्रातर्फे मेडिकल कॉलेज अकोला येथे ऑक्सिजन प्लांट उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. तिसऱ्या टप्प्यात कोराडी(नागपूर), पारस(अकोला) आणि परळी (बीड) येथे वीज केंद्र परिसरातच रिफिलिंग/बॉटलींग प्लांट उभारण्यात येणार आहे.
कामठी येथील लोकार्पण सोहळ्याप्रसंगी जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभोजकर, कामठी नगरपरिषदेचे अध्यक्ष शहाजहा अंसारी, उपाध्यक्ष अहफाज अहमद, जिल्हा शल् चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. नयना दुपारे, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर आदींची उपस्थिती होती.