नागपूर - महाज्योती बचाव कृती समिती नागपूरकडून आज समाज कल्याण कार्यालय समोर 'ढोल वाजवा गोंधळ' आंदोलन करण्यात आले. ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी समाजासाठी महाज्योतीची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर पुढे काहीच हालचाली झालेल्या नाहीत. संस्था स्थापन झाली मात्र अद्याप कुठल्याही प्रकारचा निधी संस्थेला मिळालेला नाही. मात्र, सारथी आणि इतर संस्थांना निधी देण्यात आलेला आहे. केवळ संस्था स्थापन करून सरकार विद्यार्थ्यांची दिशाभूल करत आहे का असा प्रश्न उपस्थित करत आज महाज्योती बचाव कृती समिती नागपूरकडून आंदोलन करण्यात आले आहे. शासनाने महाज्योती संस्थेचे कार्यालय लवकरात लवकर सुरू करावे आणि संस्थेला ताबडतोब निधी उपलब्ध करून देण्यात यावा, ज्याचा फायदा विद्यार्थ्यांना देता येईल, अशी मागणी देखील आंदोलकांनी केली आहे.
राज्यातील एक कोटी ३० लाख लोकसंख्या असलेल्या भटक्या विमुक्तांवर सातत्याने अन्याय करण्यात आला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. भटक्या विमुक्त प्रवर्गाच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी महाज्योतीमध्ये अशासकीय सदस्यपदी भटक्या विमुक्तांना प्रतिनिधित्व देण्यात यावे, राज्य शासनाने सारथी आणि मराठा समाजाशी संबंधित संस्थेला ज्याप्रमाणे १२१० कोटी रुपये दिले त्याच धर्तीवर महाज्योतीसाठी २५०० कोटी रुपयांचा निधी द्यावा, भटके विमुक्त, बारा बलुतेदार, ओबीसी समाजाच्या सर्वागीण विकासासाठी शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेसाठी १२०० कोटी रुपये, वसतीगृह निर्वाह भत्त्यासाठी १६० कोटी रुपये त्वरित जाहीर करण्यात यावे, भटक्या विमुक्त, बारा बलुतेदार समाजाला क्रिमीलेअर मधून वगळण्यात यावे, ओबीसी समाजाची जातीगत जनगणना करण्यात यावी, बार्टी योजनेच्या धर्तीवर महाज्योतीत सर्व योजना, प्रशिक्षण, फेलोशिप त्वरित सुरू करण्यात यावे, क्रिमीलेअरची मर्यादा १५ लाख रुपये करण्यात यावी, महाज्योतीत २५ सप्टेंबर २०२० रोजीच्या आदेशान्वये केवळ धनगर समाजासाठी लागू केलेल्या योजना महाज्योतीतील सर्व घटकांना तातडीने लागू कराव्यात, तातडीने महाज्योती संस्थेमार्फत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, स्वयंरोजगार प्रशिक्षण, स्वयंरोजगारासाठी आर्थिक निधी उपलब्ध करून द्यावा, ओबीसी व भटक्या विमुक्त विद्यार्थ्यांसाठी असलेल्या डॉ. आंबेडकर मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजनेला गती देऊन विद्यार्थ्यांना सत्र २०२० - २१ ची शिष्यवृत्ती देण्यात यावी, या विविध मागण्यांसाठी महाज्योती बचाव कृती समितीकडून समाज कल्याण कार्यालय समोर ढोल वाजवा गोंधळ आंदोलन करण्यात आले.