नागपूर - कोरोनाची स्थिती हाताबाहेर गेलेली नाही, स्थिती नियंत्रणात आहे. त्यामुळे लॉकडाऊन हा पर्याय नसल्याचे मत ऊर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी बैठकीनंतर व्यक्त केले आहे. लॉकडाऊनमुळे लोकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होतो. त्याचबरोबर आर्थिक प्रश्न देखील निर्माण होत आहे. म्हणूनच नागरिकांमध्ये शिस्त लावण्यासंदर्भात उपाययोजना करण्यावर भर दिला जाणार असल्याचे ते म्हणाले.
नागपूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या चिंता वाढवणारी ठरत असल्याने शहरात पुन्हा लॉकडाऊन लावण्यासंदर्भांत तर्कवितर्क लावले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज पालकमंत्री नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये शहरातील परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. आजची परिस्थिती आणि भविष्यात उद्भवणाऱ्या परिस्थिती संदर्भात सखोल चर्चा झाल्यानंतर तूर्तास नागपूर जिल्ह्यात लॉकडाऊन लावला जाणार नसल्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
लॉकडाऊन लावल्याने आर्थिक प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे लॉकडाऊन हा पर्याय नाही, असे पालकमंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केले आहे. नागपुरात कोरोना रुग्ण संख्या वाढली आहे, त्यामागचे कारण म्हणजे टेस्टिंगचे प्रमाण वाढले आहे. तर वाढलेल्या मृत्यूमागे अनेक कारणं आहेत, लोकांकडून कोरोना आजाराचे लक्षण लपावण्याचे प्रकार समोर येत आहेत. वेळ हातून निघाल्यानंतर रुग्ण पुढे आल्याने देखील मृत्यूचा आकडा वाढल्याचे राऊत यांनी सांगितले.