नागपूर - लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या आर्थिक विवंचनेतुन नागपूरात एका व्यवसायिकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. उपेंद्र ताराचंद महादूले, असे आत्महत्या करणाऱ्या व्यावसायिकाचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी उपेंद्र यांनी सुसाईड नोट लिहून ठेवलेली आहे. त्यातून त्यांच्या आत्महत्येच्या कारणाचा खुलासा झालेला आहे.
नागपूरमधील जैन हॉस्टेल येथे उपेंद्र महादूले यांच्या मोठ्या भावाच्या मालकीचे बिछायत केंद्र आहे. तर तिथूनच उपेंद्र केटरिंगचा व्यवसाय चालवायचे. मात्र, लॉकडाऊनमुळे सर्व नियोजित लग्न, वाढदिवस आणि इतर कार्यक्रम रद्द झाले. त्यामुळे केटरींगचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प पडला आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. कोणत्याही बातून कोंडी फुटण्याची शक्यता दिसत नसल्याने काल (रविवार) संध्याकाळी उपेंद्र यांनी हॉस्टेलच्या वरच्या माळ्यावर एका खोलीत गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
हेही वाचा.... 'सोयाबीन बियाणे बोगसगिरी प्रकरणी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ देणार नाही'
उपेंद्र यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. पोलिसांनी ती सुसाईड नोट जप्त करून तपास सुरू केला आहे. याशिवाय नागपूरात एका डीजे व्यावसायिकाने सुद्धा आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. वैभव चौधरी असे त्याचे नाव आहे. त्याच्या आत्महत्ये मागचे कारण अद्याप समोर आलेले नाही. त्याने सोनेगाव तलावात उडी घेऊन आत्महत्या केली आहे. सध्या लॉकडाऊन मुळे अनेकांच्या समोर आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे.