नागपूर - नागपूरच्या ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरवर वर्षभरापूर्वी अपघातात पाय तुटलेल्या जखमी असवस्थेतील रान बोक्याला आणण्यात आले. दरम्यान वर्षभर आरोग्यसेवा आणि बोनलेस चिकन आणि कोंबडीचा पाहूणचार घेऊन अखेर रान बोक्याला मूळ अधिवासात सोडण्यात आले. पाय तुटल्याने कठीण सर्जरी आणि यशस्वी उपचारामुळे शेतकरी मित्र, अशी ओळख असलेल्या रान बोक्याला अधिवासात सोडणे शक्य झाले.
हेही वाचा - Recce of RSS Hq : नागपूर पोलिसांनी श्रीनगरला जाऊन 'त्या' दहशतवाद्याची केली चौकशी
नागपूरच्या ट्रान्झिट सेंटरवर जखमी प्राण्यांना उपचार देत जीवदान दिले जाते. सुमारे वर्षभरापूर्वी म्हणजे, डिसेंबर 2020 मध्ये पेंच व्याघ्र प्रकल्पालगतच्या नॅशनल हायवे 7 वर अपघातात जखमी झालेल्या रान बोक्याला उपचारासाठी ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरला आणण्यात आले होते. अपघातात बोक्याच्या 3 पायांना गंभीर इजा होऊन एक पाय तुटला होता. एक्स - रे अहवालावरून ट्रिटमेंट सेन्टरचे डॉ. मयूर काटे, डॉ. सय्यद बिलाल अली, डॉ. रांचे, असिस्टंट सिद्धांत मोरे व समीर नेवारे यांनी त्याच्या एका पायाची सर्जरी केली. त्यात रॉड टाकट उपचार करण्यात आला. यावेळी रानबोक्याला सहज अन्न खाता यावे यासाठी सुरवातीला द्रव्य स्वरुपात अन्न दिले गेले.
सुरवातीला बोनलेस चिकन आणि नंतर कोंबडीचा झाला पाहुणचार
सुरवातीला पायाचे हाड कमजोर असल्याने अगदी छोट्या पिंजऱ्यात कमी हालचाल होईल या पद्धतीने त्याला बोनलेस चिकनचा पाहुणचार देत ठेवण्यात आले. पुढे जंगलात सोडायचे असल्याने जंगली बोक्याला स्वतःचे अन्न स्वतःच शोधावे लागेल. यासाठी शिकार करून खाण्याची सवय तुटू नये म्हणून शक्कल लढवण्यात आली. यात त्याला मोठ्या पिंजऱ्यात ठेवून कोंबडीचा पाहूणचार देण्यात आला. शिकार करण्याची तुटलेली सवय टिकवण्यात याचा फायदा झाला. आरोग्यसेवा पूर्ण केल्यानंतर रान बोक्याला जंगलात किंवा त्याच्या अधिवासात जगू शकेल याची खात्री करून सोडण्यात आले.
यशस्वी उपचाराने जीव वाचल्याचे आत्मिक समाधान
जवळजवळ 1 वर्ष 7 दिवस उपचारासाठी ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरला राहिलेला हा पहिलाच रान मांजर पेशंट होता. हाड जुळल्यानंतर रॉड काढण्यात आला. त्यामुळे, या रान बोक्यावर उपचार करू शकलो, याचा आनंद असल्याचे ट्रान्झिट सेंटरचे संचालक कुंदन हाते यांनी सांगितले. इतकी कठीण सर्जरी झालेला आणि पाहुणा म्हणून आलेला बोक्या घरी गेला हे बघून खूप आत्मिक समाधान मिळाले, आज एक जीव ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरमुळे वाचला व सुखरूप त्याच्या स्वगृही परतला.
हेही वाचा - Nagpur Murder Case : दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरून तरुणाची हत्या