नागपूर - वाढती म्युकरमायकोसिसची रुग्णसंख्या पाहता मुंबई उच्च न्यायाल्याच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्देशानुसार कामकाजाला सुरुवात झाली आहे. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका आयुक्त यांच्या सूचनेवरून म्युकरमायकोसिसच्या टास्क फोर्सचा विस्तार करून सदस्य संख्या 13 वरून 21 करण्यात आली आहे. यानंतर शनिवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन चर्चा करण्यात आली आहे.
आजारावर नियंत्रण आणण्याबाबत विचारमंथन
या बैठकीमध्ये शहरातील रुग्णांची संख्या, उपचाराची पद्धत, जनजागृती आणि आजारावर नियंत्रण आणण्याबाबत विचारमंथन झाले. तसेच उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर तेरा सदस्यीय समितीला बावीस सदस्यीय समिती असे विस्तारित स्वरूप देण्यात आले. या बैठकीमध्ये म्युकरमायकोसिस व अन्य बुरशीजन्य आजाराबद्दल तज्ज्ञांची चर्चा झाली.
विविध कामाची जबाबदारी समितिकडे
या चर्चेमध्ये सोमवार पर्यंत उपचार करणाऱ्या सर्व हॉस्पिटलकडून माहिती गोळा केली जाणार आहे. तसेच या संदर्भात उपचाराची प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्यासाठीही एक उपसमिती नेमण्यात आली आहे. शहरातील उपचार करणाऱ्या हॉस्पिटलचे सर्वेक्षण करण्यासाठीही एक समिती तयार करण्यात आली आहे. सोबतच आजाराच्या जनजागृतीसाठी मोहिम आखण्याचे सुद्धा निर्देशित करण्यात आले. या बैठकीला जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर, टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. प्रशांत निखाडे व इतर डॉक्टर उपस्थित होते.
हेही वाचा - दिलासादायक : महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट 95 टक्के, 3 महिन्यात पहिल्यांदाच सर्वात कमी रुग्ण