नागपूर - विदर्भातील नागपूर जिल्हा मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर आहे. याठिकाणी आंतराज्यीय चेकपोस्ट कार्यरत आहेत. मात्र, येथील चेक पोस्टवर गुंडांनी कब्जा केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. नागपूरच्या सीमेवर केळवद, खुर्सापार आणि कांद्री चेकपोस्टवर आहेत, त्या सर्व पोस्टवर गुंड प्रवृत्तीचे लोक वाहनांना थांबवतात आणि प्रत्येक ट्र्क चालकांकडून प्रत्येक फेरीसाठी एक हजार रुपयांची अवैध वसुली करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र, ट्रक चालकांकडून होत असलेल्या लुटीकडे प्रादेशिक परिवहन विभाग दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.
![nagpur border check post](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-ngp-02-check-post-corruption-7204462_15102020211847_1510f_1602776927_651.jpg)
महाराष्ट्राच्या आंतरराज्य सीमेवरचे असलेल्या या चेकपोस्टवर येणाऱ्या ट्र्क आणि इतर कमर्शीयल / वाणिज्यिक वाहनांचे ते घेऊन जात असलेल्या वजनासह वजन केले जाते. स्वयंचलित वजन काट्यावर वाहनाच्या वजनाची नोंद होत असतानाच डिजिटली त्या वाहनाच्या परवाने आणि इतर कागदपत्रे तपासले जातात. जर वाहनांमध्ये वजन जास्त असेल तर परिवहन अधिकाऱ्यांनी त्या वाहनाला नियमाप्रमाणे दंड लावणे अपेक्षित असते. आणि वजन नियमाप्रमाणे असेल तर त्या वाहनाला पुढे जाऊ दिले पाहिजे असे नियम आहे. मात्र, सर्वांना एकच नियम लावून रोज लाखो रुपयांची अवैध वसुली केली जात आहे.
परिवहन विभागाचेही हात काळे?
विशेष म्हणजे चेकपोस्टवर परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित असताना हे सर्व प्रकार चालतो. जो पर्यंत एक हजार रुपायांची वसुली दिली जात नाही, तो पर्यंत त्या ट्रक मध्य प्रदेशातुन महाराष्ट्राच्या हद्दीत आणि महाराष्ट्रातून मध्यप्रदेशच्या हद्दीत प्रवेश करू दिले जात नसल्याचे वास्तव ट्रक चालकांनीच पुढे आणले आहे. या संदर्भात काही ट्रक चालकांनी छुप्या पद्धतीने आपल्या मोबाईल मध्ये या गुंडाची वसुली कैद केली आहे. या व्हिडिओ मध्ये स्पष्ट दिसून येत आहे.
हे गुंड कशा प्रकारे आर्थिक मंदीत अडकडेल्या ट्रॅक चालकांच्या मजबुरीचा गैरफायदा घेऊन त्यांच्याकडून लाखो रुपयांची वसुली करत आहेत. या संदर्भात आरटीओ कार्यालयाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. एवढं काय तर परिवहन अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच हा उघड भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप होऊ लागला आहे. त्यामुळे परिवहन विभागाचे अधिकारी या भ्रष्ट्राचारात आपलेही हात काळे करून घेत असल्याची शंका या व्हिडिओमुळे स्पष्ट होते. आता हा प्रकार पुढे आल्यानंतर तरी राज्य सरकार यावर कायदेशीर कारवाई करण्याची हिंमत दाखवेल का हा खरा प्रश्न ट्रक चालकांकडून विचारला जात आहे