नागपूर - मध्यवर्ती कारागृहात करोनाचा शिरकाव झाल्यावर आज गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपूर कारागृहाला भेट देऊन पाहणी केली. आतापर्यंत नागपूर कारागृहातील कैदी, कर्मचारी व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्य अशा 103 जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. यामुळे कारागृहात दहशती पसरली आहे. कारागृहातील 46 कैद्यांनाही कोरोना झाला आहे.
सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहातून पॅरोलवर सोडलेल्या साडे सातशे कैद्यानंतरही कारागृहात सुमारे अठराशे बंदिवान कैद आहेत. याच कैद्यांवर नजर ठेवण्यासाठी सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहातील अधिकारी आणि कर्मचारी दोन पथकात विभागून प्रत्येकी पंधरा दिवस कारागृहाच्या आत आणि पुढील पंधरा दिवस क्वारंटाईन अशा स्वरूपात काम करत आहेत. ११ जून ते २६ जून दरम्यान तुरुंग प्रशासनातील जे अधिकारी आणि कर्मचारी कारागृहाच्या आत होते. त्यापैकी एक कर्मचारी कारागृहातून बाहेर आल्यानंतर कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले होते. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कारागृहाच्या परिस्थितीचा आढावा घेतला.
कारागृहात तयार करण्यात येणाऱ्या भोजनाच्या साहित्यापासून कारागृहात कोरोनाचा प्रवेश झाल्याची शक्यता गृहमंत्री देशमुखांनी व्यक्त केली. सोबतच कारागृहात आवश्यक असलेल्या सर्व नियमांचे पालन व योग्य खबरदारी घेण्यात येत असल्याचीही माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी दिली.