नागपूर - सध्यातरी नागपूरमध्ये लॉकडाऊन करण्याची परिस्थिती नसल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले आहे. लॉकडाऊन करायचे की नाही, याकरीता प्रशासकीय अधिकारी अभ्यास करत आहे. त्यानुसारच ते निर्णय घेतील असेही गृहमंत्र्यांनी यावेळी सांगितले. नागपुरात सर्वपक्षीय आमदार खासदार आणि अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.
नागपूरात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता सर्वत्र पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याची चर्चा होत आहे. अशातच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपूरात सध्यातरी लॉकडाऊन लागणार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, लॉकडाऊन लावायचे की नाही याबाबत अधिकारी अभ्यास करून निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितल्याने अधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि इतर मुद्यांवर चर्चा आणि विचारविनिमयासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती.
हेही वाचा - ईटीव्ही भारत विशेष : काँग्रेसचा माजी नगरसेवक आहे 'चौकीदार'!
दरम्यान, नागपूर शहर आणि नागपूर ग्रामीणची सद्यस्थिती पाहता लॉकडाऊनची गरज वाटत नाही. परंतु परिस्थिती नियंत्रणात आणायचे असेल तर सर्वानी नियमांचे पालन करणे देखील गरजेचे आहे. लॉकडाऊनबाबत अधिकाऱ्यांना अभ्यास करण्याचे आदेश दिले आहेत, असे अनल देशमुख यांनी सांगितले. त्यामुळे नागपूरात लॉकडाऊन होणार का? या चर्चेला आता काही प्रमाणात का होईना विराम मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.
गृहमंत्र्यांनी अधिकाऱ्यांनी दिलेल्या अभ्यासाच्या अहवालावरून एकदंरीत लॉकडाऊनचा निर्णय होणार असल्याने या अहवालाकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.