नागपूर - विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. नागपुरातदेखील सकाळपासून पाऊस सुरु आहे. त्यामध्ये जवळपास दोन तास मुसळधार पाऊस झाल्याने नाले तुडुंब भरून वाहू लागले. तसेच अनेक रस्त्यांवर पाणी साचले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतीची कामे खोळंबली असून जनजीवनही विस्कळीत झाले आहे.
हेही वाचा - तोतलाडोह धरणात ४३ टक्के पाणीसाठा; नागपुरकरांवरचे जलसंकट टळले - चंद्रशेखर बावनकुळे
जिल्ह्यामध्ये गेल्या ५ दिवसापासून पाऊस सुरू आहे. मात्र शुक्रवारी मुसळधार पाऊस बरसला. अचानक सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे जनसामान्यांना मिळेल तिथे आडोसा घ्यावा लागला. पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याची माहिती पुढे आली आहे. जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात उभ्या कारवर एक झाड कोसळल्याने गाडीचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर सतत पाऊस सुरु असल्याने शेतीच्या कामात व्यत्यय येत आहे. उडीसा आणि पश्चिम बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने विदर्भात दमदार पाऊस होत आहे. तसेच हवामान खात्याने विदर्भातील अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला आहे.