नागपूर - देशभरातील अनाथालयातील मुलींच्या लग्नाची जबाबदारी केंद्र सरकारने उचलावी, अशी मागणी खासदार कृपाल तुमाने यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिल्ली येथे भेटून केली. वयाच्या १८ वर्षांनतर लग्नापर्यंत त्यांना अनाथलयात राहू द्यावे, असेही निवेदन केले. सोबतच तुमाने यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा केली. अनाथ मुलींच्या प्रश्नावर सरकार गंभीर असून या प्रकरणात जातीने लक्ष देणार असल्याचा शब्द गृहमंत्री शाह यांनी खासदार कृपाल तुमाने यांना दिला. भारतात सुमारे साडे तीन कोटी मुले अनाथ असून, दरवर्षी यात भर पडत आहे. या विषयी नीति आयोगाने अद्याप सर्वेक्षण केलेले नाही व त्याबाबत माहिती गोळा केली नाही, असे खासदार तुमाने म्हणाले.
हेही वाचा - Narayan Dwivedi Murder Case : अल्पवयीन मुलीच्या प्रेम प्रकरणामुळे नारायण द्विवेदींची हत्या
अनाथ मुलांचा डेटा सार्वजनिक करा - युनिसेफच्या संकेतस्थळावर (वेबसाईट) भारतातील अनाथ मुलांची कोणतीही माहिती उपलब्ध नाही. या ऊलट आफ्रिकेतील गरीब देशांनी त्यांचा डेटा सार्वजनिक केला आहे. संसेदत महिला बाल कल्याण मंत्रालयाकडून अनाथ मुलांची संख्या व अनाथालयांची माहिती मागितल्यावर केंद्रीय दत्तक प्राधिकारणाचा डेटा पुरविल्या जातो, असेही तुमाने गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
अनाथालय सोडल्यानंतर मुलीची परिस्थिती काय, माहिती घ्या - देशभरात गैर सरकारी संस्था (NGO) द्वारे अनाथालये चालविली जातात. त्यातील काहींना अनुदान दिले जाते. मात्र, येथे असलेले अनाथ सज्ञान झाल्यावर म्हणजेच 18 वर्षांचे झाल्यावर अनाथालय सोडावे लागते. यानंतर खऱ्या अर्थाने अनाथांना समस्यांचा सामना करावा लागतो. विशेषत: मुलींची स्थिती अधिकच बिकट होते. अनाथालय सोडल्यावर या मुली कुठे जातात, कशा राहतात, कुठे राहतात याबाबत कोणतिही महिती सरकारकडे नाही.
लग्नापर्यंत त्यांना अनाथलयात राहू द्यावे - नॅशनल क्राईम ब्युरोच्या आकडेवारीनुसार, मानव तस्करीची प्रकरणे वाढू लागली आहे. दरवर्षी मोठ्या संख्येत महिलांच्या अपहरणाच्या घटना समोर येतात. अनाथ मुलींची काय अवस्था असावी, सरकार कोट्यवधी रुपये अनाथालयांच्या अनुदानात खर्च करते, मात्र 18 वर्षे झाल्यावर अनाथालयातून बाहेर पडणाऱ्या मुली जर चुकीच्या हातात पडून त्यांचे अनिष्ठ झाल्यास या घटना सरकारसाठी नव्हे तर सर्व भारतीयांसाठी शरमेची असेल. त्यामुळे, वयाच्या १८ वर्षांनतर लग्नापर्यंत त्यांना अनाथलयात राहू द्यावे अशी मागणी तुमाने यांनी केली.
अनाथ मुलींच्या लग्नाची जबाबदारी घ्या - पंतप्रधान मोदी यांनी ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ चा नारा दिला आहे. अशा वेळी अनाथालयातून बाहेर पडणाऱ्या मुलींची काय अवस्था आहे, यावर नजर ठेवणे आपण सर्वांचे कर्तव्य आहे. याचमुळे अनाथ मुलींसाठी योग्य वराचा शोध घेऊन त्यांच्या लग्नाची जबाबदारी सरकारने घ्यावी. सोबतच त्यांच्या लग्नापर्यंत अनाथालयात ठेवण्यात यावे. शिवाय त्यांच्या लग्नाचा खर्च केंद्र सरकाने वहन करावा, अशी आग्रही मागणी खासदार तुमाने यांनी केली.
मराठीला अभिजात दर्जा द्या - मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणीही खासदार तुमाने यांच्यासह शिवसेना खासदारांनी केली. मराठी भाषेचा इतिहास, समृद्ध ग्रंथ परंपरा, भाषेचा होणारा विकास व समृद्धी याबाबतची माहिती खासदार कृपाल तुमाने यांच्या नेतृत्त्वात शिवसेना खासदारांनी दिली. यासोबत तुमाने यांनी रामटेक लोकसभा मतदार संघातील समस्यांचे सरकारकडून निराकरण व्हावे, अशी मागणी केली.
हेही वाचा - CNG Rate : देशात सर्वात महाग सीएनजी दर नागपुरात, अचानक झाली मोठी वाढ