नागपूर - आचारसंहिता सुरू असताना कोणीही आमदार असत नाही, यामुळे अजित पवार यांनी वेळ पाहुन आमदारकीचा राजीनामा दिला. अजित पवारांचा हा राजीनामा म्हणजे त्यांना उशिरा सुचलेले शहाणपण आणि नौटंकी आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते गिरीश व्यास यांनी केली आहे.
शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अचानक आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. या राजीनाम्यावर राजकीय वर्तुळातून अनेक उलट सुलट प्रतिक्रिया येत आहेत. भाजपचे प्रदेश प्रवक्ते गिरीश व्यास यांनीही पवार यांच्या राजीनामा नाट्यावर खरपूस टीका केली आहे.
हेही वाचा... 'ज्यांचे पैसे बुडाले त्या सामान्य माणसालापण द्या की असाच एखादा सल्ला'
राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक नेते पक्ष सोडून जात आहेत. त्यांच्या पक्षाला आता महत्व राहिलेले नाही. पक्षातील लोक का सोडून जात आहेत, याच आत्मचिंतन त्यांनी करायला हवं. राष्ट्रवादी पक्षाला योग्य दिशा नाही, त्या पक्षाची कुठेही चर्चा नाही, असे असताना लोकांची सहानुभूती मिळावी यासाठी अजित पवार यांनी राजीनाम्याचे नाटक रचले आहे आणि नौटंकी केली, अशा शब्दात गिरीश व्यास यांनी पवार यांच्यावर टीका केली आहे.
हेही वाचा... 'शरद पवारांना शिवाजी महाराजांच्या नखांची तर सर आहे का'
आचारसंहिता सुरू असताना कोणीही आमदार नसतो. त्यांनी वेळ बघून आमदारकीचा राजीनामा दिला आहे. तसेच अजित पवार यांना हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे, असेही व्यास यावेळी म्हणाले आहेत.