नागपूर - गणेशोत्सवाचा उत्साह आता शिगेला पोहचला आहे. ९ सप्टेंबरला बाप्पाचे विसर्जन केले जाईल. यंदा बाप्पाला निरोप देताना काहीश्या अडचणींचा सामना करावा लागणार आहेत. कारण नागपूर महानगर पालिकेने शहरातील सर्वच तलावांमध्ये गणेश मूर्ती विसर्जनावर पूर्णपणे बंदी घातली आहे. त्यामुळे यावर्षी बाप्पाचे विसर्जन करायचे कुठे हा मोठा प्रश्न गणेश मंडळांसमोर निर्माण झाला आहे.
कोराडी येथील तलावाचा पर्याय - यावर उपाय म्हणूम शहराबाहेरील कोराडी येथील तलावाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र, कोराडीच्यासह इतर तलाव आणि नद्यांचे अंतर अधिक असल्याने नाराजीचा सूर उमटू लागला आहे. कोराडी तलाव शहरापासून १८ किलोमीटर दूर आहे. याशिवाय वाटेत खड्डे असल्याने भक्तांच्या काळजीत भर पडली आहे.
आता विसर्जनाचा पेच - महानगरपालिकेने दिलेल्या आदेशानुसार ज्या घरगुती गणेश मूर्तींची उंची ही जास्तीत जास्त दोन फूट आणि सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तीची उंची ४ फुटांपेक्षा अधिक नसावी. या निकषात न बसणाऱ्या गणपतीच्या मूर्तींची जबाबदारी ही भक्तांनी स्वतः घ्यावी असे स्पष्ट आदेश देण्यात आले होते. मात्र, या नियमांकडे बहुदा सर्वच सार्वजनिक गणेश मंडळांनी दुर्लक्ष केल्यामुळे आता विसर्जनाचा पेच निर्माण झाला आहे.
विसर्जनासाठी हे पर्याय आहेत उपलब्ध - शहरातील कोणत्याही तलावात गणेशमूर्तीच्या विसर्जनावर पूर्णपणे बंदी असल्याने गणेशाचे विसर्जन कुठे करायचे हा प्रश्न उपस्थित झाला आहे. तरी काही पर्याय देखील उपलब्ध झाले आहेत. त्यानुसार शहराबाहेरील कोराडी तलाव कोलार नदी, कन्हान नदी,बिना नदी, मौदा नदीवर विसर्जन करता येणार आहे. मात्र सर्व पर्याय हे शहरापासून १५ ते २५ किलोमीटर अंतर दूर आहेत.
शहरात ६४० गणेश मंडळे - नागपूर शहरात एकूण ६४० गणेश मंडळांमध्ये गणपती बाप्पांची स्थापना झाली आहे,त्यापैकी सुमारे ४४० गणेश मंडळांनी नागपूर महानगर पालिकेची परवानगी घेतली आहे. अनंत चतुर्थी च्या दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात गणेश मूर्त्यांचे विसर्जन केले जाईल,तेव्हा उपलब्ध पर्यायानुसार नियोजन करावे लागणार आहे.
हेही वाचा - विधान परिषदेच्या १२ जागांसाठीची महाविकास आघाडी सरकारची यादी राज्यपालांनी केली रद्द