नागपूर - मध्यंतरी मी महानायक अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची भेट झाली तेव्हा त्यांनी मला वयापेक्षा पंधरा वर्षे तरुण दिसत असल्याचा प्रमाणपत्र दिले होतं. हे केवळ आणि केवळ योग केल्याने शक्य झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.
आरोग्यात भरपूर सुधारणा - नियमित प्राणायाम आणि योग केल्यामुळे माझे आरोग्यात भरपूर सुधारणा झाली आहे. काही वर्षांपूर्वी माझे आरोग्य चांगले नव्हते. नंतर मी नियमित प्राणायाम सुरू केला आणि आज त्याचे भरपूर लाभ मिळत असल्याचे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे.
भारतीय संस्कृती खूप महान आहे - आपली हिंदू संस्कृती भारतीय संस्कृती खूप महान आहे. मात्र फक्त आपण महान म्हणून चालणार नाही. मुळात आपल्या संस्कृतीची महानता योग आणि आयुर्वेद सारख्या ज्ञानाशी जोडलेली आहे. त्यामुळे जिथे-जिथे जगात फिरतो. तिथे लोक आयुर्वेद आणि योग बद्दल बोलतात, विचारतात. आज अनेक मुस्लीम राष्ट्रांमध्ये योग शिक्षकांची मागणी वाढली आहे. ते योग शिकण्यासाठी लाखो रुपये वेतन द्यायला तयार आहेत फक्त आपण आपला ज्ञान चांगल्या तऱ्हेने प्रेझेंट करायला शिकलो पाहिजे असेही गडकरी म्हणाले.
गडकरींच्या कामाचे कौतुक - उल्लेखनीय बाब म्हणजे गडकरी यांचे यापूर्वीही अनेकांनी विविध बाबतीत कौतुक केले आहे. राज्याची उपराजधानी नागपूर शहराचे वाढलेलं वैभव, इतिहास अनुभवण्यासाठी नुकतेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Maharashtra Navnirman Sena President Raj Thackeray ) यांनी नागपूरच्या फुटाळा तलाव येथे नव्याने तयार करण्यात आलेल्या म्युझिकल फाउंटन ( Nagpur Musical Fountain ) 'लेझर शो' बघण्यासाठी हजेरी लावली होती. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ( Union Minister Nitin Gadkari ) यांच्यासह भाजप, मनसेचे अनेक नेते उपस्थित होते. सुमधुर गीतांवर नाचणारे पाणी, कारंजे बघून राज ठाकरे यांनी नितीन गडकरी यांच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले होते.