नागपूर - इकॉनामिक एक्सप्लोसिव्ह लिमिटेड या खाजगी कंपनीने मंगळवारी नागपुरात झालेल्या एका कार्यक्रमात पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या हॅण्डग्रेनेड्सची पहिली खेप संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत भारतीय लष्कराकडे सोपवली आहे. डीआरडीओ प्रयोगशाळेतून तंत्रज्ञान हस्तांतरणानंतर इकॉनामिक एक्सप्लोसिव्ह लिमिटेड कंपनीने ग्रेनेड तयार केले आहेत. मल्टी-मोड हँड ग्रेनेड अधिक अचूकता आणि विश्वासार्हतेसह आक्रमक आणि बचावात्मक दोन्ही प्रकारे काम करतो. संरक्षण सामुग्री उत्पादन क्षेत्रातील हा एक महत्त्वाचा टप्पा आणि 'आत्मनिर्भर भारत'च्या दिशेने एक मोठे पाऊल असल्याचे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ यांनी केले. संरक्षण सामुग्री निर्मितीत स्वयंपूर्णता आणण्यासाठी सार्वजनिक-खाजगी भागीदारीचे हे एक उत्तम उदाहरण असल्याचं संरक्षण मंत्र्यांनी सांगितले.
भारतात खाजगी उद्योगाने प्रथमच संरक्षण दलासाठी दारुगोळा तयार केला आहे. सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडची संपूर्ण मालकीची उपकंपनी इकॉनामिक एक्सप्लोसिव्ह लिमिटेड (EEL),या कंपनीने मागच्या महिन्यात सशस्त्र दलांना आधुनिक हँड ग्रेनेड पुरवायला सुरुवात केली आहे. या महत्त्वाच्या कामगिरी बद्दल ईईएलच्या 2,000 एकर संरक्षण उत्पादन सुविधा केंद्रामध्ये हस्तांतरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. खाजगी उद्योगाने स्फोटकांची पहिली खेप पुरवल्यानिमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना ईईएलचे अध्यक्ष एस. एन नुवाल यांनी उत्पादनाची प्रतिकृती भेट दिली. यावेळी लष्कर प्रमुख जनरल एम.एम. नरवणे ,डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. जी. सतीश रेड्डी, इन्फन्ट्रीचे अध्यक्ष आणि महासंचालक लेफ्टनंट जनरल ए. के. सामंत्र उपस्थित होते.
संरक्षण उत्पादन क्षेत्रात स्वयंपूर्णतेच्या दिशेने वाटचाल -
उपस्थितांना संबोधित करताना, राजनाथ सिंह यांनी मल्टी-मोड हँड ग्रेनेडचे हस्तांतरण सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांमधील वाढत्या सहकार्याचे एक उत्तम उदाहरण आणि संरक्षण उत्पादन क्षेत्रात स्वयंपूर्णतेच्या दिशेने मोठे पाऊल असल्याचे सांगितले. भारतीय संरक्षण क्षेत्राच्या इतिहासात आजचा दिवस अविस्मरणीय आहे. संरक्षण उत्पादनाच्या बाबतीत आपल्या खाजगी क्षेत्रातील उद्योगांनी चमकदार कामगिरी केली आहे. केवळ संरक्षण उत्पादन क्षेत्रातच नव्हे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘आत्मनिर्भर भारत’ साध्य करण्यासाठी देखील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे, असे ते म्हणाले.
संरक्षणमंत्र्यांकडून डीआरडीओ आणि ईईएलची प्रशंसा -
कोविड -19 निर्बंध असूनही वेगाने ऑर्डर पूर्ण केल्याबद्दल संरक्षणमंत्र्यांनी डीआरडीओ आणि ईईएलची प्रशंसा केली आणि पुढील खेप लवकरच मिळेल, अशी आशा व्यक्त केली. सशस्त्र दलांच्या सध्याच्या आणि भविष्यातील गरजा पूर्ण करू शकेल, अशा स्वयंपूर्ण उद्योगात संरक्षण क्षेत्राचे परिवर्तन करण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजनांचा त्यांनी उल्लेख केला. राजनाथ सिंह यांनी सरकारच्या आणखी एका उपक्रमाचा विशेष उल्लेख केला. तो म्हणजे, डीआरडीओकडून उद्योगांना तंत्रज्ञान हस्तांतरण. या उपाययोजना संरक्षण उद्योगाचा कणा असल्याचे सांगून त्यांनी डीआरडीओचे इनक्यूबेटर म्हणून कौतुक केले. जे तंत्रज्ञानाचे मोफत हस्तांतरण करत आहे.
भारत संपूर्ण जगासाठी संरक्षण उत्पादनांची निर्मिती करेल -
संरक्षणमंत्र्यांनी इनोव्हेशन्स फॉर डिफेन्स एक्सलन्स (iDEX) चे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले, की एमएसएमई, स्टार्ट अप, नवसंशोधक, संशोधन, विकास संस्था, शिक्षण क्षेत्र यांना सहभागी करून संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रात आत्मनिर्भरता साध्य करणे आणि अभिनव संशोधन, तंत्रज्ञान विकासाला चालना देणे हे उद्दिष्ट आहे. राजनाथ सिंह यांनी 'मल्टी-मोड ग्रेनेड', 'अर्जुन-मार्क -1' रणगाडा , 'मानवरहित सर्फेस वेहिकल आणि 'सी थ्रू आर्मर' सारखी स्वदेशी उत्पादने विकसित केल्याबद्दल उद्योगक्षेत्राचे कौतुक केले. अशी उत्पादने फक्त तयार केली जात नाहीत. तर मोठ्या प्रमाणात निर्यात देखील केली जातात. 2016-17 ते 2018-19 दरम्यान ऑनलाईन निर्यात मंजुरीची संख्या 1,210 होती. गेल्या दोन वर्षांत ती वाढून 1,774 झाली आहे. यामुळे गेल्या दोन वर्षांत 17,000 कोटी रुपयांहून अधिक संरक्षण विषयक निर्यात झाली आहे. राजनाथ सिंह यांनी विश्वास व्यक्त केला, की लवकरच भारत केवळ देशांतर्गत वापरासाठीच नव्हे. तर संपूर्ण जगासाठी संरक्षण उत्पादनांची निर्मिती करेल.
नवीन ग्रेनेड्स हे ग्रेनेड क्रमांक 36 ची जागा घेतील -
हे नवीन ग्रेनेड्स आतापर्यंत सेवेत असलेल्या पहिल्या महायुद्धाच्या विंटेज डिझाइनच्या ग्रेनेड क्रमांक 36 ची जागा घेतील. एफसीसी एमएमएचजी (FCC MMHGs) ची एक विशिष्ट रचना आहे. जी बचावात्मक (विखंडन) आणि आक्रमक (हादरवणे ) पद्धतीने उपयोगासाठी लवचिक आहे. यामध्ये अत्यंत अचूक वेगाने पुढे ढकलण्याची वेळ आहे. वापरात उच्च विश्वासार्हता आहे आणि ते वहनासाठी सुरक्षित ही आहे. या आधुनिक ग्रेनेड्सची रचना संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या टर्मिनल बॅलिस्टिक संशोधन प्रयोगशाळेने केली आहे. इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्ह लिमिटेडने 2016 मध्ये संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेकडून तंत्रज्ञान घेऊन, डेटोनिक्समध्ये खूप उच्च दर्जा राखत त्यांनी ते यशस्वीरित्या आत्मसात केले आहे.
ग्रेनेड्समध्ये 99.8% उच्च विश्वासार्हता
2017-18 मध्ये उन्हाळा आणि हिवाळा अशा ऋतूत तसेच मैदानीप्रदेश, वाळवंट आणि अति उंचीवरील प्रदेशात, भारतीय लष्कर आणि डीजीक्यूए अर्थात गुणवत्ता हमी महासंचालनालयाद्वारे याच्या यशस्वीरित्या विस्तृत चाचण्या घेण्यात आल्या. व्यावसायिक प्रस्तावाची विनंती 2019 मध्ये संरक्षण मंत्रालयाद्वारे प्रकाशित करण्यात आली आणि त्यानंतर 01 ऑक्टोबर 2020 रोजी करार संपुष्टात आला. त्यानंतर, पायदळ आणि डीजीक्यूएद्वारे सर्व मापदंडांवर मैदानी प्रदेश, वाळवंट आणि मोठ्या उंचीवरील प्रदेशात प्रथम उत्पादन नमुन्याच्या चाचण्या घेण्यात आल्या. 95 % विश्वासार्हतेच्या सामान्य कर्मचारी गुणात्मक आवश्यकच्या (जीएसक्यूआर) तुलनेत, इकॉनॉमिक एक्सप्लोसिव्ह लिमिटेडने उत्पादित केलेलया ग्रेनेड्समध्ये 99.8% उच्च विश्वासार्हता आहे. स्वदेशी सामग्रीच्या वापरामुळे मल्टी मोड हँड ग्रेनेड्स (एमएमएचजी)ची यशस्विता आणखी वाढली आहे.
हेही वाचा - महामारीबरोबर जगाची लढाई तरीही संरक्षण कंपन्यांच्या संपत्तीत वाढ
हेही वाचा - 'मिलान 2' टी क्षेपणास्त्र लष्कराला बळकट करणार, बीडीएलसोबत संरक्षण मंत्रालयाचा करार
हेही वाचा - भारताचा अभिमान : देशाची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका कोचीत तयार