नागपूर - सिकंदराबाद येथून नागपूरमार्गे निजामुद्दीन येथे जात असलेल्या राजधानी एक्सप्रेसच्या बोगीला नरखेडजवळ भीषण आग लागली. ही घटना बुधवारी रात्री दहा वाजता घडली. रेल्वे सुरक्षा रक्षकाने सतर्क दाखविल्याने आगीवर वेळीच नियंत्रण मिळणे शक्य झाले आहे. प्रवाशांचे थोडक्यात प्राण वाचले आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार सिकंदराबाद- निजामुद्दीन (१२४३७) राजधानी एक्सप्रेस बुधवारी रात्री नागपूर येथून पुढील प्रवसाकरिता निघाली होती. नरखेडजवळ येताच एसएलआर बोगीतून धूर निघत असल्याचे रेल्वे सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनास आले. त्याने लोको पायलटला ही माहिती कळविल्यानंतर रेल्वे प्रशासनदेखील सतर्क झाले. आगीने क्षतीग्रस्त असलेली बोगी रेल्वेपासून वेगळी करण्यात आली.
आग विझवण्यासाठी अग्निशमन विभागाचा बंब घटनास्थळी पाचारण करण्यात आला. अग्निशमन दलाने सुमारे ४० मिनिटांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविले. त्यानंतर रेल्वे पुढील प्रवासासाठी रवाना झाली. आगीच्या घटनेत प्रवाशांचे नुकसान झालेले नाही. सुदैवाने या आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र बोगीला आग लागल्याने प्रवाशांमध्ये भीती निर्माण झाली होती.