नागपूर - दुर्दैवाने गेल्या काही वर्षात आपल्या देशाच्या अनेक राज्यातील विविध भागांमध्ये अज्ञान लहान मुलं, अबोल निरागस चिमूकली बाळ आणि महिला लैंगिक अत्याचाराचे शिकार होण्याच्या घटना वाढत आहे. नराधमांमध्ये कायद्याची भीतीच शिल्लक राहिली नसल्याने दिवसेंदिवस विकृती वाढत असल्याने पालकांच्या मनातील भीती आणि चिंता सातत्याने वाढत आहे. दोन मुली असलेल्या एका वडिलांच्या मनात सुद्धा अनेक विचारांनी काहूर माजवला आहे. त्यामुळे हे वडील थेट सायकलने महामहिम राष्ट्रपतीच्या भेटीसाठी निघाले आहे. ऋषीकेश्वर राजू असे त्यांचे नाव असून सुमारे दोन हजार किलोमीटरचा प्रवास करून ते राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. यापुढे लहान मुलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना दुसरी तिसरी कोणतीही शिक्षा न देता थेट त्यांचा एन्काउंटर करावा अशी कायद्यात तरतूद करावी, अशी मागणी ते करणार आहेत.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून तेलंगाणा राज्यातील नालगोंडा जिल्ह्याच्या मिर्यालगुडा येथून त्यांनी प्रवासाला सुरुवात केली. 5 एप्रिल रोजी ते दिल्लीत राष्ट्रपतीची भेट घेणार आहेत. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून अनेक प्रयत्न केले जातात, मात्र दुर्दैवाने महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये दरवर्षी वाढच होत असल्याचे बघायला मिळत आहे. धक्कादायक म्हणजे एका संशोधनानुसार बऱ्याचशा प्रकरणातील आरोपी नराधम हे परिचित किंवा नाते संबंधीत असतात. त्यामुळे अशा विकृतीं वेळीच ठेचणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे.
'नराधमांचे एन्काउंटर हाच एक पर्याय'
निर्भया प्रकरणानंतर केंद्र सरकारने काही ठोस पाऊले उचलली तरी देखील अत्याचाराच्या घटनांमध्ये घट होण्याऐवजी वाढच होताना दिसत आहे. लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या वाढत्या घटनांमुळे समाजमन सुन्न झालेले आहे. डॉ. प्रियांका रेड्डी प्रकरणानंतर गेल्या वर्षी दिशा कायदा अस्तित्वात आला. मात्र तो देखील फारसा प्रभावी सिद्ध झालेला नाही. लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण वाढतच आहेत. त्यामुळे गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती आणि वाचक निर्माण करायचा असेल तर एन्काउंटर शिवाय दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नसल्याचे मत ऋषीकेश्वर राजू यांनी व्यक्त केले आहे.
ऋषीकेश्वर राजूचा सायकल प्रवास
ऋषीकेश्वर राजू यांनी 8 मार्च रोजी तेलंगाणा राज्यातील नालगोंडा जिल्ह्याच्या मिर्यालगुडा येथून सायकलने प्रवासाला सुरुवात केली. ते दररोज 70 ते 80 किलोमीटर सायकल चालवतात, त्यानंतर रात्री मिळेल ते अन्न आणि उपलब्ध झालेल्या ठिकाणी झोपी जातात. सकाळी उठून पुन्हा दिल्लीच्या दिशेने ते प्रवासाला सुरुवात करतात. आज (सोमवारी) ते भारताच्या मध्यभागी वसलेल्या नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी 14 दिवसात सुमारे 700 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला असून 1200 किलोमीटरचा पल्ला गाठायचा आहे.
हेही वाचा - Nashik Rahadi Rangpanchami 2022 : नाशिकमध्ये रंगपंचमीसाठी पारंपारिक रहाडी सज्ज