नागपूर- नागपूर शहराच्या मध्य भागातून वाहणाऱ्या ऐतिहासिक नाग नदीत एक पेक्षा अधिक मगरींचे अस्तित्व असल्याची ( Crocodiles In Nagnadi Of Nagpur ) खळबळजनक बातमी दोन दिवसांपूर्वीच 'ईटीव्ही भारत'ने प्रकाशित केली होती. या बातमीवर आता वनविभागाकडून शिक्कामोर्तब झाला आहे. नाग नदीत मगरींचे अस्तित्व सिद्ध झाल्याने आता वन विभागाकडून ( Forest Department ) मगरींना रेस्क्यू करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले ( Rescue Operation For Crocodiles ) आहे.
हेही वाचा - National Mathematics Day : 'बे एक बे', असा दोन हजार विद्यार्थ्यांचा आवाज चिटणीस पार्क येथे घुमला
महाराजबाग प्राणिसंग्रहालयाच्या ( Maharajbag Zoo ) मागील भागातून वाहणाऱ्या नाग नदीत वन विभागाने पिंजरे आणि ट्रॅप कॅमेरे बसवले आहेत. एवढेच नव्हे तर, वनविभागाकडून अधिकारी, कर्मचारी आणि वाईल्ड लाईफ या सामाजिक संस्थेच्या स्वयंसेवकांना नाग नदीच्या काठावर तैनात करण्यात आले आहे. मगरींना सुरक्षितरित्या रेस्क्यू करण्यासाठी वन विभागाकडून आणखी कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याचा आढावा 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने घेतला.
पिंजरा आणि ट्रॅप कॅमेरा बसवले
गेल्या दोन महिन्यांपासून नागपूरच्या नाग नदीमध्ये मगरींचे अस्तित्व असल्याच्या चर्चा समाज माध्यमांवर सुरू आहेत. अनेकांनी मगरी बघितल्याचा दावा केल्यामुळे नाग नदीच्या काठावर मगर बघण्यासाठी नागपूरकर गर्दी करत आहेत. सुरवातीला वन विभागाने नाग नदीत मगर असण्याची शक्यता फेटाळून लावली होती. मात्र, अनेकांनी मगरीचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल ( Nagpur Crocodile Viral Video ) केल्यानंतर अखेर वन विभाग सक्रिय झाला. वनविभागाने महाराजबाग परिसराच्या शेजारून वाहत असलेल्या नाग नदीच्या पात्रात पिंजरा आणि ट्रॅप कॅमेरे बसवले आहेत.
स्वयंसेवकांना दोनदा दिसल्या वेगवेगळ्या मगर
नाग नदीत एक पेक्षा अधिक मगरी असल्याचे बोलले जाते. त्या अनुषंगाने वनविभागाकडून अधिकारी, कर्मचारी आणि वाईल्ड लाईफ या सामाजिक संस्थेच्या स्वयंसेवकांना नाग नदीच्या काठावर तैनात करण्यात आले आहे. यावेळी दोन वेगवेगळ्या आकाराच्या मगरी दिसल्याची माहिती स्वयंसेवकांनी दिली आहे.
नाग नदीत मगरी आल्या कुठून?
दोन वर्षांपूर्वी नागपुरात मुसळधार पाऊस झाला होता. त्यावेळी शहराच्या विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. नाग नदी सुद्धा तुडुंब भरून वाहत असल्याने ते पाणी महाराजबाग प्राणिसंग्रहालयाच्या परिसरात देखील गेले होते. त्यावेळी मगरीची सात पिल्ले पिंजऱ्यातून पाण्यासोबत वाहून गेले होते. त्यापैकी मगरीची 3 पिल्लं मृतावस्थेत आढळून आली होती. मात्र, चार पिल्लं मिळाली नाही, त्यामुळे तीच पिल्लं आता मोठी झाली असून, लोकांच्या दृष्टीत पडत असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा - Crocodiles In Nagpur : नागनदीत आढळले मगरींचे अस्तित्व.. वन विभागाकडून मगरींना वाचवण्याचे प्रयत्न सुरू