नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ( RTMNU Exam ) आज अखेर उन्हाळी परीक्षेसंदर्भात निर्णय जाहीर केला आहे. नागपूर विद्यापीठाकडून घेण्यात येणाऱ्या सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा या ( RTMNU Exam Ofline Mode ) ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात येणार असल्याचे नागपूर विद्यापीठाने जाहीर केले आहे. ऑफलाईन परीक्षांना विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांचा वाढता तीव्र विरोध आहे. हा विरोध झुगारून विद्यापीठाने मोठा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी परीक्षा ही (MCQ) म्हणजेचं बहुपर्यायी फॉरमॅटमध्ये घेण्यात येणार असल्याचे जाहीर करून विद्यार्थीना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
परीक्षा ऑफलाईन मोडमध्ये - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आज विद्वत परिषदेची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत यावर्षी उन्हाळी परीक्षा ऑफलाइन मोडमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑफलाईन मोडमध्ये परीक्षा घेण्यासाठी विद्यार्थी संघटनांचा विरोध लक्षात घेता प्रश्नपत्रिका बहुपर्यायी ठेवण्यात येणार आहे. प्रश्नपत्रिकेत 50 प्रश्नांचा समावेश असेल तर उत्तर लिहिण्यासाठी विद्यार्थ्यांना 90 मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे.
असं असेल परीक्षांचे वेळापत्रक - पदवी अभ्यासक्रमाच्या सर्व परीक्षा 8 जूनपासून सुरू होतील. तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा 15 जून रोजी सुरू होतील, असे विद्यापीठातर्फे जाहीर करण्यात आले आहे. जुलै महिन्यापर्यंत सर्व परीक्षा पूर्ण करण्याचे विद्यापीठाचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार नागपूर विद्यापीठ प्रशासनाने सर्वच अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका तयार करण्याचे काम आधीचं सुरू केले होते.
हेही वाचा - धक्कादायक : डिझेल टॅंकर आणि ट्रकची भीषण धडक; अपघातात 9 जण जागीच जळून खाक