नागपूर - मनी लाँड्रिंग प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील शैक्षणिक संस्थेवर ईडीकडून छापेमारी करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. नागपूर जिल्ह्यातील फेट्री शिवारातील माहुरझरी परिसरात श्रीसाई शिक्षण संस्थेचे नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलजी कॅम्पसमध्ये ईडीचे अधिकारी पोहचले आहे. ही तीच संस्था आहे, ज्याचे अध्यक्ष अनिल देशमुख, पत्नी आणि मुलगा ऋषिकेश यामध्ये संचालक पदावर आहे. याशिवाय देशमुख यांच्या महाराष्ट्रातील इतरही ठिकाणी ईडी पथकामार्फत चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.
फेट्री येथील श्री साई शिक्षण संस्थेच्या नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या कॉलेजमध्ये ईडीने धाड टाकली आहे. या संस्थेचे अध्यक्ष खुद्द राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख असून त्यांच्या कुटुंबीयातील इतर सदस्याचा या संचालक मंडळामध्ये समावेश आहे. ईडीची ही तिसरी कारवाई असून सर्वात प्रथम सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर प्रकरण ईडीकडे गेले. त्यानंतर ईडीने नागपूर येथील निवासस्थानी धाड टाकली होती. दुसऱ्यांदा देशमुखांच्या काटोल निवासस्थानी सुद्धा काही कागदपत्र जप्त केले होते. यामध्ये शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ती हीच शिक्षण संस्था असून आज (शुक्रवार) दुपारी बारा वाजताच्या सुमारास ही धाड टाकली असल्याचे सांगितले जात आहे.