नागपूर - नागपुरातील गड्डीगोदाम येथील मूळचे रहिवासी असलेले उत्तर प्रदेशचे माजी मंत्री यशवंत निकोसे यांच्या घराची ड्रेनेज लाईन चोकअप झाली आहे. मागील तीन महिन्यांत तीन अर्ज करूनही प्रश्न सुटलेला नाही. माजी मंत्री आणि बहुजन समाज पक्षाचे पूर्वाश्रमीचे नेते राहिलेली व्यक्ती नागपूर महानगरपालिकेतील अधिकारी - कर्मचाऱ्यांकडे वारंवार विणवणी करत असतानाही त्यांची समस्या सोडवली जात नाही, तिथे सर्वसामान्य नागरिकांची काय स्थिती? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हेही वाचा - 'वकिलांशी भेटीच्यावेळी एनआयए अधिकाऱ्यांची उपस्थिती नको', वाझेंची विशेष न्यायालयात याचिका
नागपुरातील जुनी आणि आताच्या घडीला स्लम भाग झालेली वस्ती म्हणून गड्डीगोदामची ओळख झाली आहे. घर आणि लोकांची संख्या वाढली. पण वस्तीत नवीन कामे झाली नाहीत. जुनी ड्रेनेज लाईन सध्या कायमची डोकेदुखी होऊन बसली आहे. पण सामान्य वाटत असलेल्या या समस्येला उत्तर प्रदेशच्या माजी कॅबिनेट मंत्र्यांना मागील तीन महिन्यांपासून या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. पण मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.
काय आहे समस्या जाणून घ्या -
गड्डीगोदाम दाटीवाटीची वस्ती असल्याने समस्यांचे माहेरघर ठरत आहे. रस्ते अरुंद, लहानलहान बोळी, जुनी वस्ती असल्याने ड्रेनेज लाईनही जुनीच आहे. ना नाल्या, ना सुविधा यामुळे ड्रेनेज लाईन चोक झाली की सांडपाणी घरासमोर वाहते. यामुळे अस्वच्छता, दुर्गंधी हे दैनंदीन जीवनाचा भाग बनले आहे. यामुळे आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत आहे. ही समस्या दुसऱ्या तिसऱ्या व्यक्तीला नाही तर माजी मंत्र्याला भोगावी लागते. यशवंत निकोसे हे उत्तर प्रदेशच्या मायावती सरकारमध्ये 2007 ते 2012 या कालावधीत कॅबिनेट दर्जाचे मंत्री असून, सांस्कृतिक खाते त्यांच्याकडे होते.
दिवस उजाडताच सहन करावा लागतो त्रास
यशवंत निकोसे हे ड्रेनेज लाईन दुरुस्तीसाठी 3 महिन्यांपासून मनपाता चकरा घालत आहेत. लाईन चोकअप झाल्याने रोज दिवस उजाडताच या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. वयाच्या 70 व्या वर्षात असतानासुद्धा त्यांना नागपूर मनपा प्रशासनाकडे चकरा माराव्या लागत आहेत. या तीन महिन्यात तीन अर्ज केले, अनेकदा कार्यालयात चकरा मारल्यात पण फंड नसल्याचे कारण त्यांना सांगितले जात आहे.
हेही वाचा - दीदी बोले 'खेला होबे' बीजेपी बोले 'विकास होबे'; मोदींचा ममतांवर हल्लाबोल
अर्ज करूनही दुर्लक्षच; मस्या जैसे थे
या समस्येला घेऊन पहिला अर्ज 12 जानेवारीला त्यांनी केला, तोही माजी मंत्र्यांच्या लेटरहेडवर. यावर अर्धा डझन सह्यांचा शेरा मिळाला पण काम जैसे थेच आहे. दुसरा अर्ज केला 23 फेब्रुवारीला पुन्हा तेच झाले. तिसरा अर्ज महापौर दयाशंकर तिवारी यांना केला. ते समस्या सोडवती असे निकोसे यांना वाटले. महापौरांनी लगेच मंगळवारी झोनच्या कर्मचाऱ्यांना सांगितले. पण 40 फूट लांब आणि आठ इंचाचा पाईप लावून देण्यासाठी महापौर यांना सांगून दोन आठवडे लोटूनही मनपा प्रशासन किती तत्पर आहे याचे उदाहरण नजरेस पडत आहे.
आम आदमी पार्टीकडून आंदोलनाचा इशारा
मंत्री राहिलेल्या नेत्याच्या कामाला निधीसाठी तीन - तीन महिने प्रतीक्षा करावी लागत असेल तर सामान्य नागरिकांचे काम होईल का? असा प्रश्न आम आदमी पार्टीने उपस्थित केला. आपचे नागपूर संघटन मंत्री प्रभात अग्रवाल यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. आपच्या अलका पोपटकर यांनी तर वेळ पडल्यास घेराव घालण्याचा इशारा दिला आहे.
हेही वाचा - उद्धव ठाकरेंना पैसे वसुलीसाठी माणूस हवा होता; किरीट सोमैय्यांचा खळबळजनक आरोप
महापौर म्हणतात, लवकर काम निकाली काढू
या कामासाठी लागणारी आर्थिक मंजुरीनंतर तांत्रिक अडचणी दूर करुन काम केले जाणार आहे. लवकरात लवकर ते काम पूर्ण होईल, असे आश्वासन नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी ई टीव्ही भारतशी बोलतांना दिले आहे.
हताश होऊन न्याय देण्याची मागणी
मंत्रीपद मिळाल्यावर डोक्यावर घेऊन नाचणारे, आज एकही जण त्यांच्या मदतीला नाहीत. त्यामुळे ते हताश झाले आहेत. कोणीतरी न्याय द्या अशी विनवणी ते करत आहेत.