नागपूर - जिल्ह्यात जर गरज वाटल्यास यापुढे लॉकडाऊन झाले तर त्याला 'स्मार्ट लॉकडाऊन' असे संबोधले जाणार असल्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी सांगितले आहे. सोबतच या पुढील लॉकडाऊन बाबतचे निर्णय प्रशासकीय समिती मार्फत घेतले जाणार असल्याचेही यावेळी पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. विभागीय आयुक्त कार्यलयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली आहे.
नागपुरात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितीन राऊत यांनी नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात प्रशासकीय बैठक आयोजित केली होती. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत जिल्ह्यातील कोरोना स्थितीचे विश्लेषण केले. यापुढे नागपूर जिल्ह्यात लॉकडाऊन करायचे झाल्यास ते लॉकडाऊन स्मार्ट लॉकडाऊन असेल असेही ते म्हणाले. शिवाय प्रशासकीय स्तरावर एक समिती गठित केली आहे. त्या समितीच्या अहवालानुसार प्रशासनच निर्णय घेणार असल्याचे यावेळी नितीन राऊत यांनी सांगितले. सोबतच या पुढील लॉकडाऊन लागल्यास ते १४ दिवसाचे असतील अशी माहीती यावेळी पालकमंत्र्यांनी दिली आहे.
या लॉकडाऊनच्या काळात कोणत्याही व्यक्तीचे आर्थिक नुकसान होणार नाही याची जाणीव ठेवूनच निर्णय घेतला जाईल असेही ते म्हणाले. शिवाय नागरिकांनी शिस्त पाळत आपल्या जीलशैलीत बदल करणेदेखील महत्वाचे असल्याचे मत यावेळी राऊत यांनी व्यक्त केले. विशेष म्हणजे या पुढील संपूर्ण प्रक्रियेत कोणतेही राजकीय हस्तक्षेप होणार नसल्याचे यावेळी राऊत यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनी देखील लॉकडाऊन होवू नये याची जाणीव ठेवूनच आपल्या जीवनशैतील बदल करावा व नियमांचे पालन सातत्यांने करावे असे आव्हानही यावेळी नितीन राऊत यांनी केले.