नागपूर - केंद्र सरकारने आयुर्वेदिक डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्याची परवानगी दिल्यानंतर आज भारतभर डॉक्टरांचा संप सुरू आहे. नागपुरातही आयएमएकडून शांततापूर्ण संप पुकारण्यात आल्याचे पहायला मिळाले. यात दिवसभर ओपीडी सेवा व सामान्य रुग्णालय बंद ठेवत केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला. यामुळे भारतीय आयुर्वेदिक शास्त्राचे नुकसान होणार असल्याची प्रतिक्रिया आयएमए च्या अध्यक्ष डॉ.अर्चना कोठारी यांनी दिली आहे.
कमी अनुभवामुळे रुग्णांना धोका
केंद्र सरकारने आयुर्वेदिक डॉक्टरांना अत्यंत कमी कालावधीत शस्त्रक्रियंसंबंधी परवानगी दिली आहे. ती अत्यंत चुकीची असून यामुळे रुग्णांचा जीव धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी आयएमएच्या डॉक्टरांनी केली आहे.
मात्र 'या' सेवा सुरूच
आज शहरातील अलोपेथिक डॉक्टरांनी भारतभर सुरू असलेल्या संपाला पाठिंबा दर्शवत निषेध केला. शहरात आज सकाळी सहा वाजेपासून ते सायंकाळी सहापर्यंत ओपीडी सेवा व सामान्य रुग्णालय सेवा बंद ठेवण्यात आली. तसेच या संपात आपत्कालीन आणि कोरोना रुग्णांसाठीची सेवा सुरू ठेवण्यात आली आहे.
शांततापूर्ण संप
नागपुरातून या संपाला शांततापूर्ण पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे. तर शहरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी हातात बॅनर घेऊन या निर्णयाचा निषेध केला. आयुर्वेद हे वेगळे शास्त्र आहे. त्यामुळे प्रत्येक शास्त्रांनी आपल्या आपल्या शास्त्राची शुद्धपणे सराव करावे, असे उपस्थित डॉक्टरांनी सांगितले.
आयुर्वेदाबद्दल प्रचंड आदर.. परंतु निर्णय चुकीचा
आम्हाला आयुर्वेदाबद्दल प्रचंड आदर आहे. त्यामुळे दोन्ही पॅथिज एकत्रित न करता आपआपल्या कार्यक्षेत्रात काम करावे. तसेच सरकारने निर्णय तत्काळ मागे घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. नागपूर आयएमएच्या अध्यक्ष डॉ. अर्चना कोठारी यांनी ही मागणी लावून धरली आहे.