नागपूर - नागपूर शहरातील गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका 39 वर्षीय डॉक्टरने स्वतःला भूल देण्याचे इंजेक्शन टोचून आत्महत्या (Doctor Suicide in Nagpur) केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. अभिजित रत्नाकर धामणकर (Abhijeet Dhamankar) असे आत्महत्या करणाऱ्या डॉक्टरचे नाव आहे. सासरच्या मंडळींकडून सुरू असलेल्या जाचाला कंटाळून अभिजित यांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी 'अलविदा जिंदगी' असे स्टेटससुद्धा ठेवले होते.
- संसारात सासरचा हस्तक्षेप वाढल्याच्या त्रासातून आत्महत्या -
डॉक्टर अभिजित धामणकर यांचे 2011 मध्ये लग्न झाले होते. मात्र, पहिल्या पत्नीशी मनभिन्नता असल्याने त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर 2017 साली डॉक्टर अभिजित यांनी फिजिओथेरपिस्ट असलेल्या विशाखा नामक महिलेसोबत लग्न केले. दुसऱ्या पत्नीसोबत संसार सुरू झाल्यानंतर सासरच्या मंडळीकडून वारंवार हस्तक्षेप सुरू झाला होता. यावरून त्यांच्यात भांडण सुरू झाले होते. एकमेकांचे पटत नसल्याने विशाखा माहेरी गेली होती. लहान-सहान कारणांवरून त्यांच्यात वाद होत होते. त्यातूनच डॉक्टर अभिजित यांच्या पत्नीने त्यांच्या विरोधात हुंड्यासाठी छळ करत असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यावरून पोलिसांनी अभिजित विरुद्ध गुन्हासुद्धा दाखल केला होता. संसारात सासरच्या मंडळींची ढवळाढवळ वाढल्याच्या तणावातून आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांना आहे.
- अलविदा जिंदगी असे ठेवले स्टेट्स -
आत्महत्या करण्यापूर्वी डॉ. अभिजित यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. त्यात सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे नमूद केले असल्याचे पुढे येत आहे. या संदर्भात गणेशपेठ पोलिसांनी तपासाला सुरूवात केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी अलविदा जिंदगी असे स्टेटससुद्धा ठेवले होते.