नागपूर - बौद्ध धर्मियांचे श्रद्धास्थान आणि नागपूरच्या सांस्कृतीक वैभवात नेहमीच मोलाचे योगदान देत असलेल्या दीक्षाभूमीवर यंदा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा होणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे ६३ वर्षांची ऐतिहासिक परंपरा खंडित होणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दीक्षाभूमीवरील १४ ऑक्टोबरचे कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. त्यामुळे अनुयायांना दीक्षाभूमीच्या बाहेरून अभिवादन करावे लागले होते. केवळ मोजक्या लोकांच्या उपस्थित यंदा दीक्षाभूमीवर कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला सर्वसामान्य अनुयायांना प्रवेश देण्यात येणार नाही.
दरवर्षी विजयादशमीसह १४ ऑक्टोबरला दीक्षाभूमीवर होतात कार्यक्रम-
विजयादशमी दिवशी म्हणजे १४ ऑक्टोबर १९५६ रोजी घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर धम्मदीक्षा ग्रहण केली होती. तेव्हापासून दरवर्षी बाबासाहेबांचे अनुयायी दीक्षाभूमीवर येत असतात. म्हणून विजयादशमीच्या दिवशीसह १४ ऑक्टोबरला हजारो अनुयायी दीक्षाभूमीवर येत असतात. त्यानिमित्त पवित्र दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा भव्य कार्यक्रम आयोजित केला जातो.
घरी राहूनच धम्मचक्र प्रवर्तन दिवस साजरा करण्याचे आवाहन-
सध्या, नागपूरात कोरोनाचा प्रचंड संसर्ग वाढला आहे. त्यामुळे धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्यातसुद्धा संसर्गाचा धोका अधिक आहे. त्यामुळे यंदा सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव सुधीर फुलझेले यांनी दिली आहे. दीक्षाभूमीवरील कार्यक्रम वृत्तवाहिन्यांसह युट्युब चॅनेलवर पाहता येतील, असेही फुलझेले यांनी सांगितले आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रत्येक अनुयायाने आपल्या घरी राहूनच धम्म चक्र प्रवर्तन दिवस साजरा करण्याचे आवाहनदेखील विश्वस्त मंडळाने केले आहे.