नागपूर - बौद्ध धर्मियांचे श्रद्धास्थान आणि नागपूरच्या सांस्कृतीक वैभवात महत्त्वाचे योगदान देत असलेल्या प्रसिद्ध दीक्षाभूमीवर यंदा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. शहरातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात दीक्षाभूमी विश्वस्तमंडळाने परिपत्रक काढून माहिती दिली आहे.
१४ ऑक्टोबर १९५६ रोजी म्हणजेच विजयादशमीच्या दिवशी बाबासाहेबांनी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर धम्म दीक्षा ग्रहण केली होती. तेव्हापासून दर वर्षी बाबासाहेबांचे अनुयायी न-चुकता दीक्षाभूमीवर येत असतात. मात्र या वर्षी ऐतिहासिक ६३ वर्षांची परंपरा खंडित होणार असून इतिहासात पहिल्यांदाच धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.
१४ ऑक्टोबर १९५६ रोजी बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. तो दिवस होता विजयादशमीचा! म्हणूनच प्रत्येक १४ ऑक्टोबर आणि विजयादशमीच्या दिवशी हजारो आंबेडकरवादी दीक्षाभूमीवर येत असतात. म्हणूनच १४ ऑक्टोबरला पवित्र दिक्षाभूमीवर धम्म चक्र प्रवर्तन दीनाचा भव्य कार्यक्रम आयोजित केला जातो.
मात्र सध्या नागपूरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दररोज दीड ते दोन हजार रुग्ण पॉझिटिव्ह येत आहेत. धम्मचक्र प्रवर्तन दीनाच्या सोहळ्यात सुद्धा संसर्गाचा धोका असल्यानेच यावर्षी पहिल्यांदाच हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव सुधीर फुलझेले यांनी दिली आहे.