नागपूर - शहरात कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांच्या भावनेशी खेळ झाल्याचा लाजिरवाणा प्रकार घडला आहे. ठाणे जिल्ह्यात मृतदेहाची अदलाबदली झाल्याची घटना घडली होती. असाच प्रकार नागपूरात समोर आलाय. सध्या नागपूरात साडेसात हजार रुग्ण आहेत, त्यापैकी सुमारे तीन हजार अॅक्टिव्ह आहेत.
रुग्णसंख्या वाढताच भोंगळ कारभार समोर आलाय. काल नागपूरात एकूण २५ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय(मेडिकल) येथे एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मेडिकल प्रशासने या संदर्भात मृताचा नातेवाईकांना सूचना देण्याऐवजी भलत्याच रुग्णाच्या नातलगांना सूचित करून तुमचा पेशंट गेल्याची माहिती कळवली. मात्र ज्यावेळी पेशंटचे नातेवाईक अंत्यसंस्कार करण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले, तेव्हा त्या मृतदेहाची उंची बघून आपल्या नातेवाईकाचा मृतदेह नसल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी मेडिकल प्रशासनाला पटवून द्यावे लागले, की त्यांच्या रुग्णाची उंची ही ६ फूट आहे. मेडिकल प्रशासनाने दाखवलेल्या मृतदेहाची उंची त्यापेक्षा फारच कमी आहे.
यानंतर प्रशासनाची एकाच तारांबळ उडाली. हा मृतदेह कोणाचा, असा प्रश्न पडल्यानंतर अनेक तासांच्या प्रयत्नाने त्या मृताचे खरे नातेवाईक शोधण्यात प्रशासनाला यश आले आहे. मात्र या संपूर्ण प्रकारामुळे जीवंत असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. त्यांचा रुग्ण 'आयसीयू'मध्ये व्हेंटिलेटरवर असल्याचे समोर आले आहे.