नागपूर - उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज ( एप्रिल 29 ) नागपूरच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी दिवसभराच्या कार्यक्रमानंतर सायंकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी भेट ( Ajit Pawar Meet Nitin Gadkari ) घेतली. यावेळी भेटीदरम्यान विकास कामासंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याचे अजित पवारांनी सांगितले. त्यांच्यासोबत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील ( HM Dilip Walase Patil ) हे सुद्धा उपस्थित होते. यावेळी जवळपास 20 ते 30 मिनिट त्यांच्यात चर्चा झाली आहे. त्यामुळे या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, नितीन गडकरींच्या भेटीसाठी आलो होतो. मागील वर्षी नितीन गडकरींच्या विकास निधीतून निधी मिळाल्याने मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात रस्त्याचे काम होऊ शकले. त्यामुळे यंदा सुद्धा नवीन वर्षात रस्त्याच्या विकासकामांसाठी निधी द्यावा. तसेच, त्यांच्याकडे रेल्वेवर ओव्हर ब्रिज आणि रेल्वे अंडर ब्रिज यासाठी निधी आहे. त्याअनुषंगाने सुद्धा नागपूर, अमरावती, नाशिक, कोकण रेल्वे, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा अंतर्गत रस्त्यावर ब्रिजची गरज असेल. त्याकामाची यादी तयार करून द्यावी. पुण्यातील रिंग रोड मधील काही रस्ते राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यात तयार आहे. त्याबाबत ही भेट झाल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केले.
याबाबत सकारात्मक चर्चेनंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगून प्रस्ताव तयार करुन द्या. तसेच, समृद्धी महामार्ग रॉयल्टी माफ केली. त्याच पद्धतीने केंद्र सरकारच्या निधीतून काम करताना सोपे जाईल, अशा पद्धतीची चर्चा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितले आहे.