नागपूर - वन अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी अमरावती पोलिसांनी वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांना नागपूरच्या मुख्य रेल्वे स्टेशनवरून ताब्यात घेतले आहे. दीपाली चव्हाण या मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्य विभागात कार्यरत होत्या. दीपाली चव्हाण यांनी काल त्यांच्या शासकीय निवासस्थानी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चार पाणी सुसाइड नोट लिहिली होती. ती नोट पोलिसांनी जप्त केली असून त्याच आधारे पोलिसांनी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांना अटक केली आहे.
हेही वाचा - वनअधिकारी दीपाली चव्हाण यांची आत्महत्या, उपवनसंरक्षक विनोद शिवकुमारला अटक
चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर शिवकुमार बेपत्ता
वन अधिकारी दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चार पानांचे सुसाइड नोट लिहून ठेवली होती. ती पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यामध्ये आत्महत्या करण्याकरिता सर्वस्वी जबाबदार म्हणून गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांनाच जबाबदार धरण्यात यावे आणि त्यांच्यावर कारवाई केली जावी, अशा प्रकारचा मजकूर दीपाली चव्हाण यांनी नमूद केला. चव्हाण यांनी आत्महत्या केल्यानंतर शिवकुमार बेपत्ता झाले होते, ते नागपूर मार्गे इतरत्र जाणार असल्याची माहिती अमरावती पोलिसांच्या हाती लागली. त्याआधारे अमरावती पोलिसांच्या एका पथकाने सकाळपासूनच नागपूर रेल्वे स्थानकावर पळत ठेवली होती. यादरम्यान शिवकुमार रेल्वे स्टेशनवर दाखल होताच अमरावती पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा - वनाधिकाऱ्याविरोधात मांगीयावासीयांचा रोष, पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकला आदिवासींचा मोर्चा
सुसाइड नोटममध्ये करण्यात आलेले आरोप
वन अधिकारी दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये शिवकुमार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. विनोद शिवकुमार हे शारीरिक आणि मानसिक छळ करत असल्याचे त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे. शिवकुमार यांनी कमीपणा दाखवण्यासाठी माझ्या कामात जाणीवपूर्वक चुका काढायचे. मी गर्भवती असताना मला सुट्टी नाकारून रस्त्यावर फिरवले, ज्यामुळे माझा गर्भपात झाला. ते मला अश्लील भाषेत बोलायचे. रात्रीच्या वेळी कुठेही भेटायला बोलवायचे. यासंदर्भात वरिष्ठांसह खासदार नवनीत राणा यांच्याकडेही तक्रार केली. मात्र काहीही उपयोग झाला नसल्याचे सुसाइड नोटमध्ये नमूद आहे.