नागपूर - शहराला पाणीपुरवठा करणारी तोतलाडोह आणि नवेगाव खैरी हे दोन्ही धरणं भरली आहेत. त्यामुळे आता वर्षभर नागपुरला सुरळीत पाणीपुरवठा केला जाऊ शकणार आहे. मध्य प्रदेशमधून येणाऱ्या पेंच नदीवरील तोतलाडोहमधून ७० टक्के पाणीपुरवठा शहराला होतो, तर उर्वरित ३० टक्के पाणीपुरवठा नवेगाव खैरीमधून होतो.
हेही वाचा - तीन सदस्यीय प्रभाग पध्दतीला आम्ही लोकशाही पद्धतीने विरोध करू - नाना पटोले
सध्या मध्य प्रदेश आणि नागपूरमध्ये चांगला पाऊस होत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. ऑगस्ट महिन्याच्या शेवटी नागपूरमध्ये पावसाची तूट चार टक्के होती. मात्र, सप्टेंबरच्या मधात नागपूरमध्ये चांगला पाऊस झाल्याने तूट तर भरून निघाली, शिवाय चांगला पाणीसाठा देखील झाला आहे. त्यामुळे पाण्याची चिंता मिटली आहे. भविष्यात पाण्याची तूट भासू नये म्हणून पिण्याचे पाणी योग्य पद्धतीने वापरण्याचे आवाहन ऑरेंज सिटी वॉटर वर्क्सचे जनसंपर्क अधिकारी सचिन द्रवेकर यांनी केले आहे.
- २०१८ मध्ये भीषण जलसंकट:-
तीन वर्षांपूर्वी नागपूर जिल्ह्यात भीषण जलसंकट उद्भवले होते. १५ ऑगस्टपर्यंत पाऊस झाला नव्हता, त्यामुळे जलाशयांमधील मृत पाणीसाठा देखील वापरावा लागला होता. मात्र, त्यानंतर सलग तीन वर्ष चांगला पाऊस झाल्याने जलाशयांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
हेही वाचा - विशेष : गावापासून दूर वस्त्यांवर राहणारे मुलं शिक्षणापासून वंचित का?