नागपूर - ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे दिवसागणिक वाढत्या रुग्णसंख्येने पालकांमधली भीती वाढत चालली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर 15 ते 18 वयोगटांतील मुलांना 3 जानेवारीपासून लसीकरणाची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. नागपूर शहरात 9 केंद्रांवर लस देण्याची सोय महानगर पालिकेकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. लसीकरण झाल्यास नक्कीच लहान मुलांना असलेला धोका कमी होऊन पालकांनाही दिलासा मिळणार आहे.
हेही वाचा - Nagpur Online School : पालकांची भूमिका लक्षात घेऊन ऑनलाइन आणि ऑफलाइन पर्याय उपलब्ध
नागपूर मनपा प्रशासनाच्या वतीने कोविन अॅपवर नावाची नोंदणी करून ओपन स्लॉट बुक करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. शहरात लहान मुलांना साधारण 9 स्टॅटिक सेंटर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. यासोबत प्रत्येक झोनमधील दोन शाळांमध्ये अशा पद्धतीने 10 झोनमधील 20 शाळांमध्ये लसीकरणाची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
मागणीनुसार शाळांमध्ये उपलब्ध होणार लस
महानगर पालिकेकडून प्रत्येक सेंटरवर 200 मुलांना लसीकरण करून देण्याचा लक्ष्य ठेवून स्लॉट ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासोबत शाळेमध्येसुद्धा मुलांचे लसीकरण होणार आहे. ज्यांना स्लॉट मिळणार नाही त्यांना शाळेत जाऊन लसीकरण करून घेण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.
पहिल्या दिवशी ऑनलाईन स्लॉट मिळवताना अडचणी
पालकांमध्ये कोरोनामुळे भीतीचे वातावरण आहे. यात पहिल्या टप्प्यात 15 ते 18 वयोगटांतील मुलांना लस मिळणार असून पालक प्रतिक्षेत होते. यात स्लॉट मिळवण्यासाठी मोठ्या संख्यने पालकांनी पहिल्याच दिवशी साईटवर धाव घेतली. यात काहींना रजिस्ट्रेशन मिळाले. पण, काहींना स्लॉट बुक करण्यास अडचणी आल्याचे पालकांनी सांगितले.
'या' केंद्रांवर मिळणार लस
नागपुरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिहान एम्स रुग्णालय, गांधीनगर येथील मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयात, प्रगती सभागृह, आयसोलेशन हॉस्पिटल, मध्य रेल्वे रुग्णालय तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात लहान मुलांच्या लसीकरणासाठी सोय करून देण्यात आलेली आहे.
नागपुरात पार पडले होते मुलांसाठीच्या लसीचे ट्रायल
देशभरात चार शहरांमध्ये भारत बायोटेकने विकसित केलेल्या मुलांसाठीच्या लसीचे ट्रायल झाले होते. यामध्ये नागपूरच्या मेडीट्रिना रुग्णालयात 75 मुलांचे लसीकरण करून घेण्यात आले होते.
हेही वाचा - Nitin Gadkari Shopping :...आणि नितीन गडकरी नातवांच्या खाऊसाठी पोहोचले दुकानात; व्हिडीओ व्हायरल