नागपूर - लॉकडाऊन काळात संधीचे सोने करत नागपूर महापालिकेने सर्व सुविधा युक्त सुसज्ज दोन नवीन रुग्णालय तयार केले आहे. तीन रुग्णालयांच्या क्षमतेतही वाढ केली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने अवघ्या ४५ दिवसात आरोग्य सेवेबाबत ही किमया घडवून आणली आहे. ४५० खाटा असलेली पाच रुग्णालय अत्याधुनिक आरोग्य सुविधासह नागरिकांसाठी उपलब्ध करुन दिली आहेत. यातून ३०० खाटांचे रुग्णालय तयार आहे आणि उर्वरीत १५० खाटांचे रुग्णालय पुढच्या ७ दिवसात सज्ज होतील.
नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कोरोनाचा धोका वाढल्यानंतर मनपाची आरोग्य व्यवस्था निर्माण करण्याबाबत घोषणा केली होती. त्यानुसार केवळ ४५ दिवसात मनपाच्या पाच रुग्णालयांचा कायापालट झाला असून ४५० बेडसह रुग्णालय तयार झाले आहे. यात ५० बेड्ससह अतिदक्षता विभाग तयार झाले आहेत. इंदिरा गांधी रुग्णालय गांधीनगर, आयसोलेशन हॉस्पीटल इमामवाडा आणि पाचपावली स्त्री रुग्णालयाचा पूर्ण कायापालट झाला आहे. कुठल्या ही खासगी रुग्णालय आणि कार्पोरेट कार्यालयांना लाजवेल, असे या रुग्णालयाचे रुप पलटले आहे.
इंदिरा गांधी रुग्णालयाची क्षमता केवळ ३० खाटांची होती, आज ती वाढून १३० झाली आहे. येथे आईसीयू आणि ऑक्सीजनची सुध्दा व्यवस्था केली गेली आहे. तळमजल्यासोबत तीन माळ्याचे हे रुग्णालय कित्येक वर्षापासून दुर्लक्षीत होते. पण आता या रुग्णालयाचा पूर्णपणे कायापालट झाला आहे.
२० खाटांची क्षमता असलेले आयसोलेशन हॉस्पीटलमध्ये आता ३२ खाटांची सुविधा तयार झाली आहे. याची क्षमता ६० पर्यंत करण्यात येणार आहे. या रुग्णालयाचा सुध्दा संपूर्ण कायापालट करण्यात आला आहे. पूर्वीचे पाचपावली सूतिकागृह आता पाचपावली स्त्री रुग्णालय झाले आहे. पूर्वी त्याची क्षमता २० खाटांची होती. आता हे रुग्णालय ११० खाटांचे झाले आहे. के. टी. नगर हॉस्पीटल आणि आयुष हॉस्पीटल सदर हे पूर्ण नवीन असून त्यांची क्षमता अनुक्रमे १२० आणि ३० खाटांची आहे. पाचही रुग्णालये मिळून ४५० खाटांची क्षमता तयार केली आहे. प्रत्येक बेडला सेन्ट्रल ऑक्सीजनची सोय आहे.
इंदिरा गांधी रुग्णालय, पाचपावली स्त्री रुग्णालय आणि के. टी. नगर रुग्णालयात ५० खाटांचा अतिदक्षता विभाग आहे. या सर्व रुग्णालयामध्ये नवीन बेडस लावण्यात आले आहेत. टाइल्स, बाथरुम, टॉयलेटस, लिफ्ट आदीची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. या रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत मल्टीपॅरा कार्डियाक मॉनिटर, ईसीजी, सोनोग्राफी मशीन, एक्सरे मशीनची सुविधा राहणार आहे. इंदिरा गांधी रुग्णालय, पाचपावली स्त्री रुग्णालय आणि के. टी. नगरमध्ये अत्याधुनिक ऑपरेशन थिएटरची व्यवस्था करण्यात आली आहे.