नागपूर - कोरोना विषाणूचा संसर्ग नागपुरात वाढत असल्याच्या कारणामुळे महानगरपालिका प्रशासनाने शहरातील दुकानदारांना आणि दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी करवून घेणे बंधनकारक केले आहे. जे दुकानदार स्वतःची आणि कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करणार नाहीत, त्यांच्यावर महानगरपालिकेकडून कारवाई केली जाणार आहे.
दिनांक १८ ऑगस्टपर्यंत कोरोना चाचणी करण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर मात्र कारवाईला सुरवात होईल.
कोरोना नियंत्रणासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना सुरू…
तब्बल चार महिन्यानंतर कोरोनाचा एक हॉटस्पॉट म्हणून नागपूर पुढे येत आहे. गेल्या महिनाभारत कोरोनाचे दहा हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आल्यानंतर आता नागपुरात विविध उपाययोजना करायला प्रशासनाने सुरवात केली आहे. सध्या नागपुरातील रुग्ण संख्या रुग्णांचा आकडा १२ हजारच्या उंबरठ्यावर आहे. तर कोरोना बळींची संख्या ४२० पार गेल्याने सर्वांची चिंता वाढली आहे.
त्यामुळेच कोरोना नियंत्रणासाठी शहरातील सर्व दुकानदार आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. येत्या १८ ऑगस्टपर्यंत दुकानदारांनी कोरोना चाचणी करुन चाचणीचे प्रमाणपत्र दुकानात ठेवायचे आहे. ज्या दुकानादराकडे कोरोना चाचणीचे प्रमाणपत्र दिसणार नाही, त्यांच्यावर नागपूर महानगरपालिका कारवाई करणार आहे.